परशुराम उपरकर यांची किल्ले सिंधुदुर्गला भेट

आमदार - खासदारांच्या अनास्थेबद्दल टिका
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 16, 2023 19:38 PM
views 179  views

मालवण : मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत किल्ल्याच्या अवस्थेचा व छत्रपती शिवराजेश्वर मंदिराच्या सद्य स्थितीचा घेतला आढावा घेतला. अपुऱ्या कामांबाबत त्यांनी स्थानिक आमदार व खासदार यांच्या अनास्थेबद्दल त्यांनी टिका केली. 

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी मालवणातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला आज भेट दिली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री आई देवी भवानी मंदिर व छत्रपती शिवराजेश्वर मंदिर दर्शनासाठी हा विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. सोबतच नौसेना दिना निमित्ताने किल्ले सिंधुदुर्गची सद्य स्थिती नेमकी कशी आहे त्याचाही त्यांनी आढावा घेतला. माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्यासोबत मनसेचे माजी पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी, महिला सदस्य व मनसैनिक उपस्थित होते.

शिवराजेश्वर मंदिरातील सभामंडप व सभोवताली फिरुन मंदिराच्या स्थितीचा आढावा घेतला आणि मानकरी श्री. पाडावे यांच्याशी मंदिर डागडुजी व सुशोभीकरणा बाबतीत चर्चा केली. त्यानंतर सर्वांसोबत श्री आई देवी भवानी मंदीरात भेट देत त्यांनी श्रीफळ अर्पण करुन वंदन केले. 

या नंतर बोलताना मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी सत्ताधारी तसेच स्थानिक आमदार व खासदार यांच्या किल्ले सिंधुदुर्गच्या अनास्थेबद्दल व सद्य स्थितीबाबत जोरदार टीका केली व हे सर्व केवळ पेपरबाजी व फसवणूक करणारे नेते असल्याचा टोला हाणला. आपण आमदार असताना तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी १ कोटी निधी किल्ल्याच्या डागडुजीसाठी जाहीर केला होता. पण १ कोटी यायला ११ वर्ष लागली. यावरूनच लोकप्रतिनिधी किल्ले सिंधुदुर्ग साठी किती जागृत आहेत हे समजते असे संगितले. नौसेना दिन सोहळा हा भाजपचा खाजगी सोहळा नसून संपूर्ण देशाचा असल्याचे सांगत त्यांनी या सोहळ्यावर मनसेचे संपूर्ण लक्ष असेल असा इशारा दिला. लवकरच जर किल्ल्याची अवस्था सुधारली गेली नाही तर किल्ले सिंधुदुर्गवर मनसे मार्फत नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छता व साफसफाई मोहीम आखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांचे नेहमीच काटेकोरपणे पालन मनसैनिक करत असतात आणि लवकरच त्यानुसार जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या होतील असे सांगत त्यांनी काहीही झाले तरी मनसेचे सामाजिक कार्य चालूच आहे व राहील असे स्पष्ट केले.

या वेळी मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, मनविसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, हितेंद्र काळसेकर,माजी पदाधिकारी विल्सन गिरकर, विले पार्ले विभाग उपाध्यक्ष अभिजीत मेथर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसेचे तालुका अध्यक्ष संदीप लाड, मनसे कट्टा पदाधिकारी कुणाल माळवदे, श्रीकृष्ण परब, संतोष सावंत, शहर अध्यक्षा भारती वाघ, भाग्यश्री लाकडे, प्राजक्ता आढाव, हेमंत उपरकर आदी आजी माजी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.