
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची पालकमंत्री नितेश राणे यांचे खासगी ओएसडी म्हणून नियुक्ती झालेली नाही. सर्वगोड यांच्याविरोधातील विविध प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना मंत्रालयातून दूर करावे, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर यांनी, भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून मंत्र्यांचे पीएस, पीए आणि ओएसडी आपल्या देखरेखेखाली नेमले जाणार असून आणि त्यांची सर्व तपासणी करूनच नेमणुका केल्या जाणार असल्याचे जाहीर केले होते. असे असताना देखील मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सा.बां.चे तत्कालीन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे खासगी ओएसडी म्हणून काम पाहत आहेत. मंत्री राणे यांच्या कार्यालयात त्यांना एसी कॅबिन व वाहन दिलेले आहे.
सर्वगोड यांच्यावर अनेक प्रकारच्या तक्रारी असून त्याची चौकशी सुरू आहे.त्यांच्याविरोधातील काही प्रकरणात न्यायालयात व लोकायुक्तांकडे निवाडे सुरू आहेत. मंत्री राणे यांचे खासगी ओएसडी म्हणून काम करताना सर्वगौड हे आपल्यावरील होणार्या चौकशांबाबत दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधातील तक्रारींबाबतच्या चौकशा शासनस्तरावर एप्रिल २०२३ पासून प्रलंबित आहेत. ते सेवानिवृत्त झाले तरी चौकशा सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकामचे अधिकारी यांना ते फोन करून विविध कामे सांगतात. पालकमंत्र्यांच्यावतीने अधिकर्यांना सूचना देखील करतात. याशिवाय काही अधिकारी व कर्मचार्यांना पालकमंत्र्यांचे ओएसडी म्हणून फोन लावून काही आदेशही देतात. सर्वगौड हे मंत्री राणे यांच्या कार्यालयात व मंत्रालयात शासकीय ओएसडी असल्याचे भासवून मंत्रालयात वावरत असून अधिकारी व कर्मचार्यांची दिशाभूल करीत आहेत. मंत्री राणे यांचे खासगी ओएसडी म्हणून सर्वगोड यांची निवड झाली आहे का, याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे माहिती मागितली असता त्यांची ओएसडी म्हणून नियुक्ती झालेली नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात असलेली प्रकरणांची चौकशी करावी. शासनाची दिशाभूल करणारे सर्वगौड यांच्यावर कारवाई करून त्यांना मंत्रालयातून दूर करावे, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.