जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पर्णिका नाईक - खुशी नाईक यांचं सुयश..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 19, 2024 14:38 PM
views 232  views

सावंतवाडी : शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक व प्राथमिक व गटात दोघा सख्ख्या बहिणीनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. कु. पर्णिका हनुमंत नाईक आणि कु. खुशी हनुमंत नाईक अशी या दोघा बहिणींची नावे असुन त्या दोघी मूळच्या देवसु गावातील असून कुडाळ येथे शिकत आहेत. 

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात कु पर्णिका नाईक आणि कु खुशी नाईक यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते अनुक्रमे २१ व ११ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, विशाल तनपुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुधाकर ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, सरपंच आशा मुरमुरे, तालुक्याचे सर्व गटविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कु. पर्णिका नाईक कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता नववी तर कु खुशी नाईक कुडाळ पडतेवाडी प्राथमिक शाळेत चौथीत शिकत आहे. या दोन्ही बहिणींना त्यांचे वडील शिक्षक असलेले हनुमंत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. ते सांगेली माध्यमिक विद्यालयात आहेत. या दोन्ही बहिणीच्या दुहेरी यशाचे विविध क्षेत्रासह संस्थेचे पदाधिकारी स्कुल व शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.