
दोडामार्ग : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त दोडामार्ग शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विरोधात वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती फेरी काढण्यात आली. येथील तहसील कार्यालयातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा अमली पदार्थ विरोधी समितीच्या प्रमुख अर्पिता मुंबरकर यांनी याचे महत्व विषद केले. ते बोलताना म्हणाले, भारत सरकारने २०४२ पर्यंत ड्रग्स मुक्त भारत करण्याचे निश्चित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अमली पदार्थांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर ठोस उपाययोजना केल्या नाही तर जिल्ह्यातील तरुण या विळख्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या घडीला चारशेहून अधिक तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्याची शक्यता आहे. पालकांनी आपल्या मुलांना यापासून लांब ठेवण्यासाठी वेळीच सावध झाले पाहिजे. अमली पदार्थांचा व्यापार करणे आणि तो बाळगणे हा गुन्हा आहे. यासाठी वीस वर्षे कारावास, तसेच वीस लाख रुपये दंडांची शिक्षेची तरतूद केली आहे. दारू किंवा तंबाखूने व्यक्ती गुलाम बनते असे म्हटले जाते. मात्र ड्रग्समुळे देशच गुलाम बनतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.