पालकांनी मुलांबद्दल सजग राहणं गरजेचं : प्रा. रुपेश पाटील

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 18:57 PM
views 71  views

सावंतवाडी  : छत्रपती शिवरायांना घडविण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी काळाची पावले ओळखली, म्हणूनच छत्रपती प्रचंड बुद्धीचातुर्य आणि संवेदनशीलतेने घडले नव्हे तर घडवले गेले.  याचे सारे श्रेय माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांना जाते.  आजच्या काळातही पालकांनी आपल्या मुलांबद्दल तेवढेच सजग राहणे गरजेचे आहे. आज धकाधकीचे जीवन आहे, मुलं थोड्याशा अपयशाने खचून जातात व नैराश्याच्या गर्तेत जाऊन नको ते पाऊल उचलतात, अशा वेळी पालकांनी प्रचंड सजग राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दोडामार्ग येथील आमदार दीपक केसरकर विज्ञान महाविद्यालयात पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक रुपेश पाटील उपस्थित होते.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बी. व्ही. राशिवडे होते. तसेच व्यासपीठावर आयक्यूएसी विभाग प्रमुख प्रा. ए. बी. डेंगे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही मोरे उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षकच नव्हे तर पालक - शिक्षक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती.


दरम्यान आपल्या व्याख्यानात प्रा.रूपेश पाटील पुढे म्हणाले छत्रपती शिवरायांना घडविणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊ, सानेगुरुजींना घडविणारी श्यामची आई यांचा आदर्श आज प्रत्येक माय-माऊलीने घेतला तर आपली मुले नक्कीच सामाजिक जीवनात सर्वोच्च स्थान मिळवतील. एवढेच नव्हे तर पालकांच्या अपेक्षांना पूर्णत्वास नेण्यासाठी जीव तोडून मेहनत घेतील.  मात्र मुलांच्या स्वप्नांसाठी पालकांनीही सजग राहणे तेवढेच गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.


प्रा. पाटील पुढे म्हणाले की, मुलांनी आपल्या माता-पित्यांना सन्मान देणे, त्यांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयाबरोबरच आपल्या आई-वडिलांना देखील समजून घेणे आपले कर्तव्य आहे. जेवढा मानसन्मान आपण आपल्या गुरुजनांना देतो, मित्रांना देतो, तोच मानसन्मान घरातील ज्येष्ठांनाही देणे गरजेचे आहे. असे झाल्यास आदर्श कुटुंब पद्धती जोपासली जाईल, अशी भावना यावेळी प्रा. पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान यावेळी महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटनही प्रा. रुपेश पाटील व पालकांच्या हस्ते करण्यात आले. या विविध वस्तूंच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना स्व-कमाईचा आनंद मिळेल आणि त्यांना आत्मनिर्भर होण्याची एक संधी दिली जाणार आहे.


विज्ञान युगात विद्यार्थ्याने मोबाईलचा वापर सुयोग्य कारणांसाठी करावा आणि त्यावर पालकांनीही तेवढेच लक्ष द्यावे तरच देशाचा सुजाण नागरिक बनेल तसेच विज्ञान विषयाच्या पदवीनंतर नोकरी विषयकच्या संधी आणि स्पर्धा परीक्षांबद्दल प्रमुख पाहुणे प्रा. रुपेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.


पालकांमधून प्रशांत नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद वाढल्यास विद्यार्थ्यांचा पूर्णपणे विकास होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले. तसेच आता येणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त पर्यावरण पूरक मुर्त्या आणि प्लास्टिक थर्माकोलचा कमीत कमी वापर यावर तृतीय वर्ष रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी वैष्णवी बेतकेकर हिने आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभाग प्रमुख एन. एम. चौगुले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख एम. एस. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच  पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.