जनतेच्या समस्यांबाबत सत्ताधार्यांचे दुर्लक्ष का?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 14, 2025 20:03 PM
views 45  views

कणकवली : नापणे धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेचा साकव बांधण्यात आला. जिल्ह्यात पर्यटक यावेत याबद्दल आम्हाला आनंदच आहे. मात्र एकीकडे पर्यटकांसाठी काचेचा साकव बांधताना दुसरीकडे गोरगरीब जनतेला शाळकरी मुलांना स्मशानात जाणाऱ्या लोकांना जा- ये करण्यासाठी  साकवांची कोणतीही व्यवस्था नाही जिल्ह्यातील जनतेच्या या प्रश्नाबाबत सत्ताधारी मंडळींना काही देणे घेणे नाही का असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. 

जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क साकवांच्या माध्यमातून आजही होतो. या साकवांच्या दुरुस्तीसाठी 32 कोटी रुपयांची गरज आहे. आजही अनेक शाळकरी मुले, सर्वसामान्य जनता, गणपतीसाठी जा ये करणारी मंडळी किंवा स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील साकवांची पूर्ती दुरावस्था झालेली आहे. या साकवांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. वास्तविक जिल्हा नियोजन मधून यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची गरज असताना कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट खासदार असलेल्या नारायण राणे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवून पालकमंत्र्यांवरील जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. 

एकीकडे ही स्थिती असतानाच दुसरीकडे नापणे धबधब्याच्या ठिकाणी काचेचा साकव बांधून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात पर्यटक वाढत असतील त्यातून रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार हा साकवही तकलादू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य जनतेसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी निधी न देता दुसरीकडे तकलादु गोष्टींसाठी कोट्यावधीचा निधी खर्च केला जात आहे. ही जिल्ह्यातील जनतेची फसवणूक असल्याची टीका श्री. उपरकर यांनी केली आहे.