
सावंतवाडी : आपल्या तळागाळातील गाबीत समाज बांधवांच्या आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आरोंदा, ओटवणे गावातील गाबीत समाजाच्या बैठकीत बोलताना केले आहे.
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज सिंधुदुर्ग, गाबीत समाज सावंतवाडी - दोडामार्ग यांच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विविध गावातील गाबीत समाज बांधवांच्या संपर्क दौऱ्यात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत माजी आ.परशुराम उपरकर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हटले की,यापुढे आमच्या समाजातील मत्स्यव्यवसायिक महिला टोपलीद्वारे मासे विक्री करणार नसून त्या ई बाईक द्वारे घरोघरी जाऊन मासे विक्री करणार आहेत. त्यामुळे त्यांना कुणी गाबतीन आली असे न म्हणता मासेवाली मच्छी विक्रेती आली असे म्हणू लागतील. मार्केट मध्ये आमच्या महिला मत्स्यव्यवसायिक भगिनी स्टॉलवर मासे विकू लागतील, स्वच्छ जागेत अन् मार्केटमध्ये बसून मासे विक्री करतील तेंव्हा समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
त्यासाठी गाबीत समाज बांधवांनी एकजूट दाखविली पाहिजे. म्हणूनच येत्या मे 25 मध्ये सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विविध भागातील गाबीत समाज बंधू भगिनींना एकत्र आणून मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.
सावंतवाडी दोडामार्ग तालुका शाखेचे विभागीय सरचिटणीस दीपक तारी यांनी प्रास्ताविक केले. गाबीत समाज जिल्हाध्यक्ष श्रीचंद्रशेखर उपरकर यांनी गाबीत समाजाच्या जिल्हास्तरीय संघटन, समाजातील विविध प्रश्न, वधू वरांचे प्रश्न, मत्स्य व्यावसायिक महिलांचे प्रश्न, मच्छीमार बांधवांच्या अडचणी, मुलांचे शैक्षणिक प्रश्न व दाखले अशा अनेक विषयांवर स्पष्ट विचार व्यक्त केले.
ओटवणे येथील गाबीत समाज बांधवांच्या बैठकीसाठी बांदा आरोसबाग, कुुडासे,वगैरे भागातील समाज बांधव उपस्थित होते. तुकाराम बांदेकर, संतोष सावंत, सुधाकर तारी, सौ. मीना तारी, हर्षद बांदेकर, स्वप्नील तारी, श्रवण तारी, प्रणव उपरकर हे उपस्थित होते. तर आरोंदा येथील बैठकीसाठी सावंतवाडी, आरोंदा व इतर भागातील मच्छीमार महिला व समाज बांधव उपस्थित होते. आरोंदा संस्थेचे सचिव श्री.शशिकांत श्री.पेडणेकर, गोकुळदास मोटे, अनंत चांदेकर, रमाकांत सावंत, पांडुरंग कोरगावकर, उमेश नाईक सर्व सौ.कांचन कुबल, प्रभांगी तारकर, सोनाली मोटे, भावना कुबल, भाग्यश्री तारी, स्नेहा चोडणकर, शुभदा वेळणेकर, शीतल पेडणेकर, निलेश चोडणकर, अशोक खोबरेकर, वसंत टाककर, रामचंद्र तांडेल, पांडुरंग नवार, भानुदास तारी, शिवाजी चोडणकर, वासुदेव चोडणकर, वसंत चोडणकर, रघुवीर पेडणेकर, लक्ष्मण मोरजे, दत्ताराम तारी, राजन चांदेकर, चंद्रशेखर रेडकर वगैरे समाज बांधव उपस्थित होते. सर्व समाज बांधवांनी सावंतवाडी येथील गाबीत समाज मेळावा उत्साहाने साजरा करण्याचे एकमताने ठरविले आहे.