दुमदुमली दक्षिण कोकणची पंढरी..!

दर्शनासाठी सोनुर्लीत भाविकांचा जनसागर
Edited by:
Published on: November 28, 2023 16:04 PM
views 140  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला आहे. जत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यसह गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक सोनुर्लीत हजेरी लावत आहेत. गाभाऱ्यात फळा, फुलांची आरास करण्यात आली असून भरजरी साडी, दागिन्यांनी सजविलेल्या देवीच्या पाषाणास आज वेगळच तेज दिसून येत आहे. सकाळपासून मुखदर्शन, ओट्या भरण्यांचा कार्यक्रम सुरु झाला असून रात्री लोटांगण घालून नवस फेडले जाणार आहेत. मंगळवारी पहाटेपासून भाविकांच्या गर्दीत कोकणची पंढरी दुमदुमून गेली आहे. बुधवारी तुलाभारानंतर जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. 

दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी माऊलीची ओळख आहे. या देवीचा वार्षिक जत्रोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर गोवा, कर्नाटक या राज्यातही प्रसिद्ध आहे. लोटांगणासाठीची जत्रा म्हणून या जत्रोत्सवाची ओळख आहे. श्री देवी माऊलीचा उत्सव हा त्रिपुरारी पौर्णिमेपासून सुरू होतो. मंगळवारपासून या उत्सवास प्रारंभ झाला आहे. आज रात्री लोटांगणासाठी भक्तांच्या गर्दीचा महापुर लोटणार आहे. जत्रोत्सवासाठी लाखो भाविक दर्शनासाठी सोनुर्लीत दाखल होत आहेत. मंगळवार सकाळपासूनच त्याची सुरूवात झाली आहे. भक्तांचा महापुरात सोनुर्ली गाव डुंबला आहे. ओट्या भरणे, नवस फेडणे यासाठी पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. जत्रोत्सव निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खाजे, खेळणी, खाद्य विक्रीची दुकानंही सजली आहेत. आबालवृद्धांचा ओढा त्या ठिकाणी दिसत आहे. मुख्य मंदिरापासून जवळच असलेल्या देवीच्या कुळघरात देखील भाविक मातेचरणी नतमस्तक होत आहेत. 


या उत्सवाचे नियोजन श्री देवी माऊली व्यवस्थापन समितीकडून करण्यात आलं आहे. आज रात्री लोटांगण सुरू केली जाणार आहेत. पारंपरिक पद्धतीने देवीचा उत्सव साजरा करताना लोटांगण, पालखी सोहळा पहाण्यासाठी भाविक रात्री सोनुर्लीत हजेरी लावणार आहेत. सात ते आठ हजार स्त्री आणि पुरुष लोटांगण घालणार आहेत. हा उत्सव पाहण्यासाठी देखील अलोट गर्दी होणार आहे. पालखी सोहळ्यानंतर दशावतारी नाटकही सादर केले जाणार आहे. माऊलीच्या उत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळ आणि खाजगी वाहनांचे नियोजन केले आहे. त्याच्या पार्किंगसाठी देखील देवस्थान व्यवस्थापन समितीनं पुढाकार घेतला आहे. माऊलीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, आरोग्य प्रशासन देखील नियोजन करून उत्सव सुरळीत पार पाडावा म्हणून प्रयत्नशील आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील याबाबत प्रशासनाला नियोजन करण्याचे निर्देश देऊन सोमवारी उत्सवस्थळी मंदिरात भेट दिली होती.

श्री देवी माऊलीचे महात्म्य सातासमुद्रापार पसरल आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुळाभार कार्यक्रम होणार आहे. देवीच्या चरणांकडे बोललेले नवस अथवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तगण तुलाभार करणार आहेत. अशाप्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता उद्या दुपारनंतर होणार आहे.