नुकसान झालेल्या भातपिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी

सातार्डा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांची तहसीलदारांकडे मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 17:46 PM
views 183  views

बांदा : सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात गेले दहा-बारा दिवस परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. संध्याकाळच्या वेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्याखाली गेला. बहुतांश ठिकाणी भातपीक पाण्याखाली आले असून कापणी केलेले पीक कुजले. त्यामुळे शासन स्तरावरून नुकसान झालेल्या भातपिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी, सातार्डा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.

परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने कापणीयोग्य झालेले भातपीक शेतात सडत आहे. तीन महिने घेतलेली मेहनत परतीच्या पावसात बुडाल्याने पिकाला कोंब येण्याची शक्यता असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणले. त्यामुळे भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्यावा अशी मागणी श्री.माधव यांनी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. अद्यापपर्यंत परतीचा पाऊस गेला नसल्यामुळे संपूर्ण भातशेती धोक्यात आली आहे. डोळ्यादेखत उभ्या शेतीचे नुकसान होत असलेले पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी यशवंत माधव यांनी प्रशासनाकडे केली.