
सिंधुदुर्ग : पंचायत समिती निवडणूक नुकतीच पार पडली असून सभापती आणि उपसभापती पदांची निवडही झाली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी कामकाजाला सुरुवात केली असली, तरी प्रशासनातील मूलभूत सोयीसुविधांबाबत गंभीर प्रश्न समोर येत आहेत. सभापतींना अधिकृत वाहन उपलब्ध असतानाही त्या वाहनाला चालक नसल्याचे समोर आले आहे. तर काही पंचायत समितीत वाहन एकच आणि प्रवास सभापती आणि गटविकास अधिकारी दोघेही करतात. त्यात चालकाची कसरत होत आहे.
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून नुकत्याच सभापती, उपसभापती निवड प्रक्रियाही पूर्ण झाली. सभापती, उपसभापतींनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातून शहरात असलेल्या पंचायत समितीत येण्या जाण्यासाठी तसेच तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी, बैठका, दौरे यासाठी हे वाहन महत्त्वाचे मानले जाते. मात्र सध्या त्या वाहनासाठी स्वतंत्र चालक नसल्याने सभापतींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या पंचायत समितीत गटविकास अधिकारी (BDO) आणि सभापती या दोघांसाठी एकच चालक उपलब्ध आहे. त्यामुळे या एकाच चालकावर दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्याचा मोठा ताण पडत आहे. एका बाजूला गटविकास अधिकाऱ्यांचे अधिकृत दौरे, बैठका, शासकीय कामकाज तर दुसऱ्या बाजूला सभापतींचे कार्यक्रम, गावभेटी आणि विकासकामांची पाहणी या सर्वांसाठी एकाच चालकावर अवलंबून राहावे लागत आहे. वाहन दोन पण चालक एकच असल्याने एकाच्या दौऱ्यात दुसऱ्याला ताटकळत राहावे लागत आहे. दोघांनाही ने आण करण्यासाठी त्या चालकाला कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील काही पंचायत समितीत एक वाहन निर्लेखित करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच वाहनाने गटविकास अधिकारी आणि सभापती यांना प्रवास करावा लागत आहे. त्यांना नवीन वाहन आणि चालक मिळणे आवश्यक आहे.
त्यामुळे नुकत्याच विराजमान झालेल्या सभापतींवर आता . “कुणी चालक देता का चालक?” असे विचारण्याची वेळ आली आली आहे. प्रशासनातील नियोजनाच्या अभावामुळे ही निर्माण झालेली ही परिस्थिती आहे. शासनाकडून वाहन उपलब्ध करून देण्यात आले असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेली मनुष्यबळ व्यवस्था करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दरम्यान, पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र चालकाची नियुक्ती करण्याची मागणीही आता पुढे येऊ लागली आहे. सभापतींचे अधिकृत कामकाज सुरळीत पार पडावे आणि प्रशासनावर अनावश्यक ताण पडू नये यासाठी लवकरात लवकर चालकाची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे ग्रामविकासाच्या योजना राबविण्याची जबाबदारी असलेली पंचायत समिती आणि दुसरीकडे त्या समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला वाहनासाठी चालक मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतंत्र चालकासहित वाहनाच्या प्रतीक्षेत सभापती आहेत.











