माझी माती माझा देश' ; रत्नागिरीत अधिकारी - कर्मचाऱ्यांची पंचप्रण शपथ

Edited by: भरत केसरकर
Published on: August 09, 2023 19:24 PM
views 70  views

रत्नागिरी : क्रांती दिनाचे औचित्य साधून होत असलेल्या 'माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात  ‘पंचप्रण शपथ’ घेण्यात आली. प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सभागृहात उपस्थित सर्वांना पंचप्रण शपथ दिली.

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशाताई कांबळे,  उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मारुती बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसिलदार तेजस्वीनी पाटील, तहसिलदार ज्ञानेश्वर म्हेत्रे तसेच कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

     निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी या उपक्रमाबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात ९ ते २० ऑगस्ट दरम्यान, ‘माझी माती, माझा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था  स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये “देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून हे अभियान आयोजित करण्यात येत आहे. पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विविध कार्यालयामध्ये शपथ

    माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा वन विभाग, चिपळूण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र आदी कार्यालयांमध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.