
देवगड : देवगड तालुक्यात मध्ये ठिकठिकाणी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे व पालखी ची परिक्रमा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा कार्यक्रम सुरू आहे. या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी महाराष्ट्रभर फिरत आहे. चार व पाच फेब्रुवारी या कालावधीत ही पालखी देवगड तालुक्यातील देवगड जामसंडे शहर, कुणकेश्वर, मिठबाव व तळेबाजार या ठिकाणी आली होती. मोठ्या भक्तीमय वातावरणात सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या पालखी पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
या ठिकाणी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पालखी परिक्रमेची जबाबदारी सर्व स्वामीसेवक नियोजन पद्धतीने आनंदी वातावरणात करताना दिसत होते. देवगड तालुक्यात या पालखीचे असंख्य स्वामी भक्तांनी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. मंगळवारी वायंगणी मठ, त्यानंतर आचरा येथून ही पालखी सायंकाळी पाच वाजता देवगड जामसंडे शहरात आली होती. जामसंडे देवगड शहरात स्वामींच्या पालखी पादुकांचे भाविकांनी औक्षण करून स्वागत केले. देवगड येथील श्री स्वामी समर्थ मठ, देवगड एसटी स्थानक, देवगड किल्ला हनुमान मंदिर, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मळई येथील स्वामीभक्त दिपाली धुरी, या ठिकाणी ही पालखी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. बुधवारी सकाळी दहा वाजता ही पालखी देवगड होऊन कुणकेश्वर येथील अभिरुची हॉटेल या ठिकाणी आली. कुणकेश्वर मध्ये ही पालखीचे स्वामी भक्तांनी स्वागत केले असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. कुणकेश्वर येथून कातवण येथील स्वामीभक्त बाबू शिंदे यांच्या निवासस्थानी ही पालखी देण्यात आली. त्यानंतर मिठबाव येथील श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी ही पालखी देण्यात आली.
मिठबाव येथे पालखीचे आगमन होताच फटाके लावत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक मठापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत महिला वर्ग देखील सहभागी झाला होता. सायंकाळी चार नंतर ही पालखी तळेबाजार येथील गणपती मंदिरात नेण्यात आली. गुरुवारी सकाळी स्वामींच्या पादुकांची पालखी हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठात नेण्यात आल्या आहेत व येथून १०:३० वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या.