पालघर जिल्हा हादरला ; अनेक भागांत भूकंपाचे धक्के

नागरिक भयभीत...
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 23, 2022 09:41 AM
views 293  views

पालघर : पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पालघर जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज (२३ नोव्हेंबर) पहाटे ४ वाजेच्या सुमारास भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच असून हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते.


मात्र, आता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवाने आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नसली, तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले असून या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.


दरम्यान, पालघरमध्ये आज पहाटेच्या सुमारास डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात ३.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही.


पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांच्या अनुषंगाने राज्य शासनाने अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता व वारंवारता कमी झाल्याने तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे.