सेल बंद करण्याबाबत आमची भूमिका योग्‍यच होती

कापड व्यापारी संघटनेची भूमिका
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 12, 2023 11:55 AM
views 127  views

कणकवली : कणकवली शहरातील तो सेल बंद करण्यासाठी आम्‍ही आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. त्‍यानंतर तातडीने सेल बंद झाला. सेल बंद पाडण्यासाठी त्‍यावेळी आम्‍ही उचललेले पाऊल योग्‍यच होते अशी भूमिका कापड व्यापारी संघटनेच्यावतीने मंदार आळवे यांनी आज मांडली.

येथील हॉटेल एमएच ०७ च्या सभागृहात  कापड व्यापारी संघटनेची पत्रकार परिषद झाली. यात मंदार आळवे यांनी भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुलभा देसाई यांच्यासह प्रवीण डामरी, दादा केणी, रमित घाणेकर, रामू बजाजी, सतीश गावडे, सूरज रणशूर, संजय सावंत, सतीश गावडे आदी कापड व्यावसायिक उपस्थित होते.

आळवे म्‍हणाले, कणकवलीतील  तो सेल बंद पाडण्यासाठी आम्‍ही आमदार नीतेश राणे यांना भेटलो. त्‍यानंतर त्‍या होलसेल विक्रेत्‍याने देखील तातडीने सेल बंद केला. वस्तुत:  जीएसटी आणि इतर नियम धाब्‍यावर बसवून होणारे सेल हे बेकायदेशीर आहेत. यापुढे असे सेल येऊ नयेत यासाठी आम्‍ही आमचे धोरण ठरविणार आहोत.

आळवे म्‍हणाले, जो व्यापारी होलसेल व्यवसाय करतो, त्‍याने किरकोळ विक्री क्षेत्रात उतरू नये असा अलिखित नियम आहे. ज्‍या भागात व्यवसाय करण्यासाठी तुम्‍ही जीएसटी नंबर घेतला असेल त्‍याच भागात व्यवसाय केला पाहिजे किंवा नवीन व्यवसायाच्या ठिकाणी नवीन जीएसटी क्रमांक काढायला हवा. पण त्‍या होलसेल व्यापाऱ्याने सर्व नियम धाब्‍यावर बसवून सेल सुरू केला होता. त्‍या सेलमध्ये अत्यंत कमी किंमतीमध्ये मालाची विक्री होत होती. त्‍याचा मोठा फटका शहरातील कापड व्यापाऱ्यांना बसणार होता. त्‍यामुळे तातडीने हा सेल बंद करण्यासाठी आम्‍ही आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. 

ते म्‍हणाले,  कणकवलीतील सेल बंद पाडल्‍यानंतर सर्वसामान्यांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्‍या. व्यापाऱ्यांबाबत नाराजीही व्यक्‍त झाली. पण शहरात ७० कापड व्यावसायिक आहेत. त्‍यांचीही कुटंुबे आहेत याचा विचार व्हायला हवा. आमचा सेलला विरोध नाही. सेल लावणाऱ्या व्यापाऱ्याने रीतसर परवाने घ्यावेत आणि पंधरा दिवसांसाठी नको तर पूर्ण वर्षभर व्यवसाय करावा आमची त्‍याला हरकत नाही. पण निवडक ५० प्रकारच्या वस्तु आणायच्या आणि त्‍या बाजारभावापेक्षा अत्‍यंत कमी किंमतीमध्ये विकून स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापाऱ्यांचे नुकसान करायचे ही बाब योग्‍य नाही. पण ऐन सणासुदीच्या काळातील अशा बेकायदेशीर सेलमुळे कणकवलीतील कापड व्यापाऱ्यांचे प्रचंड असे नुकसान होणार होते. दरम्‍यान आम्‍ही राणेंची भेट घेतल्यानंतर व्यापारी संघामध्ये फुट पडली. व्यापाऱ्यांमध्ये एकी नाही अशा वावड्या उठविण्यात आल्‍या आहेत. मात्र आम्‍ही सर्व व्यापारी एकसंध आहोत असेही श्री.आळवे म्‍हणाले.