अन्यायाच्या विरोधात आमची संघटना लढणार : अनिल राणे यांचे प्रतिपादन !

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला गुणवंतांचा सन्मान
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 16, 2023 10:40 AM
views 250  views

सावंतवाडी : आम्ही कोणत्याही पक्षाचे किंवा राजकीय व्यक्तीचे मिंदे नाहीत. आमची संघटना ही सातत्याने अन्यायाच्या विरोधात उभी असून 'जिथे जिथे अन्याय, तिथे तिथे शिक्षकेतर कर्मचारी संघटना'  नेटाने लढा देईल. वेळप्रसंगी आम्ही संघर्ष देखील करीत आलो आहोत, हाच प्रामाणिक प्रयत्न पुढील काळातही सुरू राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे यांनी येथे केले. शहरातील कळसुलकर हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने नुकत्याच विद्या सेवक पतपेढी निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक मंडळाचा तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतून जे बांधव व भगिनी निवडून आलेत अशा व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक काका मांजरेकर, जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे, विद्या सेवक पतपेढीचे नूतन अध्यक्ष प्रा. पवन वनवे, उपाध्यक्ष शरद जाधव, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, कोटकामते सरपंच ऋतुजा खाजनवाडकर, वैभव केंकरे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्या सेवक पतपेढी निवडणुकीतील विजयी संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यात प्रा. पवन वनवे, शरद जाधव, मुख्याध्यापक जयवंत पाटील, पांडुरंग काकतकर, विठ्ठल सावंत, गोविंद कानसे, तेजस गुडेकर, हंबीरराव अडकुरकर, हर्षाली खानविलकर, अनुष्का गावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोटकामते सरपंच ऋतुजा खाजनवाडकर यांचाही सन्मान करण्यात आला.

 तर विशेष सन्मान म्हणून कणकवली अध्यापक विद्यालयाचे लिपिक निलेश पारकर यांचा संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विद्या सेवक पतपेढीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश तिवरेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.


दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेव्हा जेव्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांवर अन्याय होतो, तेव्हा वेळ, काळ न पाहता आमची संघटना धावून जाते. कोणतीही अपेक्षा न करता कर्मचारी बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी आमची संघटना सातत्याने संघर्ष करीत आली आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

 संघटनेचे सचिव गजानन नानचे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शाळेचा आत्मा असतो. शिक्षिकेतर कर्मचारी बांधवाला कोणी कमी लेखू नये. आम्ही एकोप्याने व निष्ठेने कर्मचारी बांधवांसाठी लढा देत आलो आहोत, आमचा हा लढा असाच अविरत सुरू राहील, त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर बांधवांची आम्हाला सहकार्याची गरज आहे.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव केंकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निलेश पारकर यांनी मानले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.