अन्यथा रेल्वे स्थानकात उपोषणाला बसणार

रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा अन्यथा रेल्वे स्थानकात उपोषणाला बसणार ; रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा
Edited by:
Published on: March 21, 2025 18:43 PM
views 331  views

वैभववाडी : वैभववाडी रेल्वेस्थानकात अनेक सुविधांचा अभाव आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी आम्ही वर्षभर पाठपुरावा करीत आहोत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी,लोकप्रतिनिधी यांच्याकडे लोकशाही मार्गाने मागण्या मांडण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप यावर ठोस उपाययोजना होत नाही. आमच्या महत्वाच्या मागण्या एप्रिल महिन्यात पुर्ण झाल्या नाही तर मे महिन्यात वैभववाडी रेल्वेस्थानकात आंदोलन छेडु असा इशारा कोकण रेल्वे प्रवाशी संघटना वैभववाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहावर प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत मुद्रस,कार्याध्यक्ष विठ्ठल मासये,किशोर जैतापकर,श्रीकृष्ण सोनार,एकनाथ दळवी,तेजस आंबरेकर,रत्नाकर कदम,आदी उपस्थित होते.

अध्यक्ष मुद्रस म्हणाले कोरोनामध्ये बंद करण्यात आलेली वैभववाडी रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडकी आजपर्यंत बंदच आहे.इतर स्थानकातील ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.जादाचे भारमान असूनही देखील वैभववाडी स्थानकाला वेगळा न्याय का असा प्रश्न आहे.त्यामुळे तातडीने ही सुविधा सुरू करावी,वैभववाडी स्थानकातुन वैभववाडी,गगनबावडा,देवगड,कणकवली,राजापुर तालुक्यातील काही असे प्रवाशी प्रवास करतात.त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील अनेक स्थानकांपेक्षा या स्थानकांमध्ये चांगले भारमान मिळते.त्यामुळे वैभववाडी रेल्वेस्थानकात नेत्रावती एक्सप्रेस,एलटीटी कोचुवेली एक्सप्रेस,तेजस एक्सप्रेस,एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा,याशिवाय वैभववाडी रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण,पुल,निवारा शेड यासह विविध मागण्यां आम्ही रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या आहेत.वर्षभरापासुन या मागण्यांसाठी आम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहोत.परंतु रेल्वे प्रशासनाकडुन कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.लोकप्रतिनिधींना देखील आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे.रेल्वे प्रशासनाने यातील महत्वाच्या मागण्या एप्रिलपुर्वी पुर्ण कराव्यात अन्यथा मे महिन्यात आम्ही वैभववाडी रेल्वे स्थानकात लोकशाही पध्दतीने आंदोलन करू असा इशारा श्री.मुद्रस यांनी दिला आहे.