अन्यथा... जनआंदोलन ; जावेद खतीब यांचा इशारा !

बांदा - नेतर्डे रस्त्याचे खड्डे बुजविण्याची केली मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 17, 2023 19:13 PM
views 151  views

बांदा : जोखीम कालावधी संपण्यापूर्वीच बांदा - नेतर्डे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून या रस्त्याची तात्काळ डागडूजी करावी, अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकासच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात खड्डे न बुजविल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा उपसरपंच जावेद खतीब यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बांदा ते आरोसबाग गोवा सीमेपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीतच रस्ता वाहतुकीस खराब झाला आहे. गतवर्षी मागणी केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात डागडूजी करण्यात आली होती. रस्त्याच्या जोखीम कालावधीची मुदत ही २ महिन्यात संपणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या डागडूजीची जबाबदारी ही सर्वस्वी आपल्या खात्याची आहे.

खराब झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण लवकरात लवकरच करावे, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असे उपसरपंच श्री. खतीब यांनी सांगितले. यावेळी कनिष्ठ अभियंता राजाराम धर्णे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.