जि. प. च्या सर्वसाधरण सभेत तब्बल एवढ्या कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 15, 2026 18:56 PM
views 25  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत नारीशक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. महिलांना अधिक प्रतिनिधित्व आणि सन्मान देणाऱ्या विधेयकाला विरोध करणे चुकीचे असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. याच सभेत सन २०२६-२७ च्या ३४ कोटी ३४ लाख ७९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी दहावी-बारावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नवनिर्वाचित आमदारांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यानंतर नारीशक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून सभागृहात राजकीय वातावरण तापले. सदस्या सुमेधा पाताडे यांनी या विधेयकाला काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांकडून होत असलेल्या विरोधावर आक्षेप घेत निषेध व्यक्त केला. महिलांना सन्मान आणि प्रतिनिधित्व देणाऱ्या विधेयकाला विरोध करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.यावर भाष्य करताना कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले असून, महिलांना अधिक सन्मान आणि संधी मिळत असताना त्याला विरोध करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनीही काँग्रेस व त्यांच्या घटक पक्षांचा निषेध नोंदविला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या ३४ कोटी ३४ लाख ७९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास सभागृहाने मंजुरी दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या पुरवणी आराखड्यालाही मान्यता देण्यात आली.

 दोन सदस्य एकाही समितीवर नाहीत

 जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी आज नव्याने सदस्य निवड प्रक्रिया पार पडली. मात्र, सदस्य राजन चिके आणि संजय गावडे यांनी कोणत्याही समितीसाठी अर्ज न केल्याने त्यांची एकाही समितीवर निवड झालेली नसल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.