
कणकवली : तळेरे बस स्थानक येथे महिलांच्या बसमधील दागिने, रोकड लंपास करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कणकवली पोलिसांनी अटक केली. यामध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. रूपाली पिंटू चौगुले (वय ३८), दीपाली खन्ना चौगुले (वय ३५), सपना समशेर चौगुले (वय ३९), प्रेम पिंटू चौगुले (१९, सर्व रा. निपाणी - बेळगाव) व बायजाबाई सुभाष देडे (४२, वडगाव - कोल्हापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील प्रेम चौगुले याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व कणकवली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी निपाणी येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कुठली सुनावली. त्याच्याकडील चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित महिलांनाही पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात कणकवली शहरातून ताब्यात घेतले. यातील बायजाबाई ही यापूर्वीच एका गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे तर उर्वरित तीन महिलांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंबईत राहणाऱ्या पूजा बाबाजी वायंगणकर (वय ३३) ह्या आपले मूळ घर पावशी (ता.कुडाळ) येथे काही दिवसांसाठी राहण्यास आल्या होत्या. १३ मे रोजी त्या कुडाळ येथून बापार्डे (ता.देवगड) येथे जाण्यास निघाल्या. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कणकवली-विजयदुर्ग ही बस तळेरे बसस्थानकात आली. या बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्याचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्याकडे असलेल्या पर्समधील एक स्टीलचा डबा चोरून नेला. पूजा यांनी तिकीट काढण्यासाठी पर्स उघडली तेव्हा त्यांना पर्समधील स्टीलचा डबा दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी बसमधून उतरून बसस्थानक परिसरात शोधाशोध केली. पण त्यांना स्टीलचा डबा आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद नोंदवली.
पूजा वायंगणकर यांच्या पर्समधील स्टीलच्या डब्यामध्ये २७ ग्रॅम ५०० मिली वजनाचे १ लाख ३७ हजार ५०० रूपये किंमतीचे एक मंगळसूत्र, ११ ग्रॅम ५०० मिली वजनाची आणि ५५ हजार रूपये किंमतीची एक सोन्याची चेन, १२ ग्रॅम ५०० मिली वजनाची ६२ हजार ५०० रूपये किंमतीची एक सोन्याची चैन, ५ ग्रॅम वजनाची २५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन, ५ ग्रॅम वजनाच्या दोन आणि ५० हजार रूपये किंमतीची सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅम वजनाची १० हजार रूपये किमतीची नथ तसेच रोख १८०० रूपये असा एकूण ३ लाख ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरीस गेला.
सलग दोन दिवस तळेरे बसस्थानकातून प्रवाशांच्या बॅग, पर्समधील सोन्याचा ऐवज लंपास होत असल्याने कणकवली पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकांनी तळेरे, नांदगाव आणि कणकवली बसस्थानकामध्ये संशयितांचा कसून तपास सुरू ठेवला होता. यात या चोरी प्रकरणात प्रेम पिंटू चौगुले (वय १९, रा.निपाणी) याला काल (ता.१४) स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता पर्स लांबविण्याच्या घटनांमध्ये चार महिलांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कणकवली बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात शोध घेऊन या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तळेरे बसस्थानकातील चोरी प्रकरणाचा तपास केला जात आहे. या चोरीच्या घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.










