
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेमार्फत गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. बारावी परीक्षेत गायत्री बागलकर, दत्तराज पै, वैदेही पारकर, शुब्रा प्रभुगावकर आणि पूनम दळवी या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम पाच क्रमांक पटकावले. तर दहावी परीक्षेत रागनी कुलकर्णी, भार्गवी शेटवे आणि सान्वी कारेकर या तिन्ही विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच सुधांशु धुरी, कृष्णा पास्ते आणि विराज राऊळ यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, जिल्हा परिषद सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रमोद कामत यांनी, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावा, असे स्वप्न होते. शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याला अग्रस्थानी ठेवण्याचे काम येथील विद्यार्थी करत असून, त्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यापुढेही मेहनत, जिद्द आणि सातत्य कायम ठेवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.










