कणकवली : पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उबाठा शिवसेनेने कणकवलीत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. उबाठा शिवसैनिकांनी येथील बसस्थानक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक असा मोर्चा काढत, पेट्रोल दरवाढ, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. पेट्रोल, डिझेलची दरवाढ थांबली नाही तर राज्यभर मोर्चा काढू, असा इशाराही नाईक यांनी दिला. उबाठा शिवसैनिकांनी 'रद्द करा, रद्द करा – पेट्रोल दरवाढ रद्द करा', 'पेट्रोल, डिझेलची दरवाढ करणार्या भाजप सरकारचा जाहीर निषेध असो', 'कहा गये अच्छे दिन', 'शिवसेना जिंदाबाद', 'आवाज कुणाचा – शिवसेनेचा' अशी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, पेट्रोल, डिझेलसह सीएनजी, गॅस सिलिंडर यामध्येही दरवाढ झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. आज मोदी सरकारने आवाज उठविण्यासाठी विरोधकही शिल्लक ठेवले नाही. अशा स्थितीत सर्वसामान्य माणूस गप्प राहीला तर मोदी सरकार १५ ते २० रुपयांनी देखील पेट्रोल, डिझेल दरवाढ करेल. म्हणूनच मोदी सरकारला इशारा देण्यासाठीच आम्ही आंदोलन केले आहे.
एकीकडे नरेंद्र मोदी हे लोकांना चालत फिरायला सांगत असून स्वत: मात्र परदेशात फिरत आहेत. म्हणूनच दरवाढ थांबवली गेली नाही तर लवकरच राज्यभर आम्ही आंदोलन करू. मोदी सरकारने दिलेले अच्छे दिनचे आश्वासन कुठे गेले? पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दुध, भाज्या अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहेत, असे नाईक म्हणाले.
'ते' आंदोलन न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहोत. आंबा, काजू बागायतदारांचा मोर्चा मुंबईत होत असून आमचे मुंबईतील तसेच सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी मोर्चात सहभागी असणार आहेत. जोपर्यंत आंबा, काजू शेतकर्यांना जास्तीतजास्त मदत होत नाही तोपर्यंत शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उबाठा शिवसेना पक्षातर्फे हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे नाईक म्हणाले.
पालकमंत्री २५ गाड्या घेऊन फिरतात
दोन मंत्र्यांकडे एकाच नंबरच्या ईव्ही कार आपण बघितल्या. कालच सिंधुदुर्गात पालकमंत्री, खासदार आणि आमदार हे जवळपास २५ गाड्या घेऊन फिरत होते. त्यामुळे लोकही यांची खिल्ली उडवायला लागलेत. कधीतरी लोकांचा उद्रेक होईल आणि लोकच रस्त्यावर उतरतील, असेही नाईक म्हणाले.
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा सातत्याने तुटवडा
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नसल्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी सातत्याने सांगत आहेत. पण, जिल्ह्यातील एकाही पेट्रोल पंपावर पेट्रोलल उपलब्ध नसते, असेही वैभव नाईक म्हणाले.
आंदोलनात उबाठा शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत – पालव, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, युवासेना पदाधिकारी राजू राठोड, सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे, विलास गुडेकर, योगेश मुंज, अजित काणेकर, तेजस राणे, चेतन पाटील, फैय्याज शेख, सहदेव नाईक, रोहीत राणे, निळकंठ राणे, स्वप्नील खांदारे आदी सहभागी झाले होते.










