सर्जनशीलतेसाठी ‘आतील मुल’ जिवंत ठेवा : निलेश पवार

‘साहित्यप्रेमी’च्या ‘रंग-संवाद’मध्ये मार्गदर्शन
Edited by:
Published on: April 26, 2026 14:19 PM
views 28  views

सिंधुदुर्गनगरी : प्रत्येकाच्या आत एक लहान मुल दडलेले असते. नवीन काही शिकायचे असेल तर त्या आतल्या मुलाला कायम जागे ठेवा. कारण ते मुल सतत प्रश्न विचारणारे, कुतूहल जपणारे आणि सर्जनशील असते, असे प्रतिपादन रंगकर्मी, अभिनेते व निवेदक निलेश पवार यांनी येथे केले. ‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ‘रंग-संवाद’ या चौदाव्या मासिक उपक्रमात ते बोलत होते. जवळपास तासभर त्यांनी रसिकांशी थेट संवाद साधत नाटक लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरणातील बारकावे उलगडून सांगितले.

कार्यक्रमाचे समन्वयक सतीश लळीत यांनी शाल, गुलाबपुष्प आणि ग्रंथभेट देऊन पवार यांचा सत्कार केला. पुरुषोत्तम लाडू कदम यांनी त्यांचा परिचय करून देताना लेखन, अभिनय, निवेदन, सूत्रसंचालन, डबिंग, समालोचन आणि मुलाखत संचालन या विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

नाटकाच्या प्रक्रियेविषयी बोलताना पवार म्हणाले की, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तांत्रिक घटक आणि रसिक यांचा परस्परसंबंध अत्यंत महत्त्वाचा असतो. “रसिक हा देखील एक उत्कृष्ट कलाकार असतो. त्याच्याशिवाय कलाकार अपूर्ण आहे,” असे त्यांनी नमूद केले. रंगमंचावर घडणारे नाटक खरे नसते, हे माहिती असूनही ते खरे वाटावे अशी जादू निर्माण करणे, हीच नाट्यकलेची खरी गंमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाटकाच्या उद्देशावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, केवळ मनोरंजन हा नाटकाचा हेतू नसून ते प्रेक्षकाला विचारप्रवृत्त करणारे आणि समाजभान देणारे असावे. “नाट्यकला ही विचारांची आंघोळ आहे,” असे ते म्हणाले. प्रायोगिक नाटक समजायला कठीण असते ही समजूत चुकीची असून, प्रेक्षकांनी त्यातील संकेत, वेशभूषा, नेपथ्य आणि प्रकाशयोजना यांची भाषा समजून घेतली तर ते अधिक सुलभ वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या अभिनय प्रवासाची आठवण सांगताना पवार म्हणाले की, चौथीत असताना अपघाताने पहिले नाटक केले. ऑडिशन पाहण्यासाठी गेलेल्या त्यांना शिक्षकांनीच सहभागी करून घेतले आणि नव्वद विद्यार्थ्यांतून त्यांची निवड झाली. “अभिनय करताना अनेकांचे आयुष्य जगता येते आणि त्यामुळे स्वतःला समृद्ध करता येते,” असे ते म्हणाले.

‘रंग-संवाद’ उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी हा कार्यक्रम कलाकार आणि रसिक यांच्यात सुसंवाद निर्माण करणारा असल्याचे नमूद केले.

प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी मराठी रंगभूमीचा आढावा घेत भरतमुनींचे नाट्यशास्त्र, विष्णुदास भावे यांच्यापासून सुरू झालेली परंपरा, कोकणातील दशावतार आणि गावागावातील नाट्यसंस्कृती यांचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट कलाकार व रसिक यांच्यात परस्पर समज वाढवणे हे असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी कवयित्री डॉ. सई लळीत यांनी आभार मानले.