देवगडचा नाट्यमहोत्सव पुणे - मुंबईप्रमाणे दर्जेदार : नितेश राणे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 26, 2026 14:50 PM
views 67  views

देवगड : देवगडमध्ये देखील दर्जेदार नाट्य संस्कृति असून तरुणांनी उभारलेला नाट्य महोत्सव हा  पुणे-मुंबईप्रमाणे दर्जेदार सांस्कृतिक व्यासपीठ आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. यावेळी त्यांनी १ मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर देवगडमध्ये सुसज्ज नाट्यगृहाच्या भूमिपूजनाची घोषणा केली.“पुढील वर्षीचा नाट्य महोत्सव आपल्या हक्काच्या नाट्यगृहातच होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, सभापती गणेश राणे, संदीप साटम, बाळ खडपे, संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर,प्रकाश बोडस, दयानंद पाटील,राजा भुजबळ, , बंड्या नारकर,आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री नितेश राणे  म्हणाले देवगडमध्ये कोणत्याही सुविधा अपुऱ्या राहू नयेत, यासाठी शासन कटिबद्ध असून मुंबईप्रमाणेच सुविधा देवगडकरांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच ‘युथ फोरम’च्या माध्यमातूनतरुणांनीदाखवलेलीनियोजनबद्धता,परिश्रम आणि सांस्कृतिक बांधिलकी यामुळे देवगडचीओळखराज्यपातळीवर अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.युथ फोरम या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित ‘नाट्य गौरव 2026’ पुरस्कार सोहळा आणि नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ नाट्यकर्मी व दिग्दर्शक राजेंद्र चव्हाण यांना यंदाचा ‘नाट्य गौरव 2026’ पुरस्कार प्रदान करून नितेश राणेंच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमास नितेश राणे  पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती दर्शवली होती.हा महोत्सव म्हणजे कलाकारांना व्यासपीठ देणारा उपक्रम असून या महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध होत असून देवगडच्या सांस्कृतिक जडणघडणीत या उपक्रमाचा मोठा वाटा असल्याचे राणे यांनी सांगितले. “तरुणांनी एकत्र येऊन उभा केलेला हा उपक्रम भविष्यात देवगडला राज्य व राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देईल,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, व्यावसायिक नाट्य क्षेत्रात देवगडमध्ये पूर्वी काम पाहणारे व्यवस्थापक भाऊ सहस्रबुद्धे व दत्ता पारकर यांचा यावेळी मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले. “कोकण पर्यटनाची राजधानी बनू शकते”यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या भाषणात कोकणातील पर्यटन क्षमतेवर प्रकाश टाकला. “कोकण प्रदेश भविष्यात पर्यटनाची राजधानी बनण्याची क्षमता ठेवतो.मी यापूर्वी येथे आलो नव्हतो; मात्र यापुढे नियमित भेट देईन,”असे त्यांनी आवर्जून सांगितले.तसेच युवक संघटनांची भूमिका विकासात महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.