कळणेत घरफोडी

Edited by: लवू परब
Published on: April 26, 2026 14:54 PM
views 188  views

दोडामार्ग : कळणे येथे घरफोडी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ८:३० वागण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत पुरुषोत्तम बळीराम देसाई यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार हे शनिवारी सायंकाळीच ७ ते ८:१५ वा.चा दरम्यान गावातील एका  हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ८:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ कमलाकर देसाई हे घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले. दरवाजा उघडून आत मध्ये गेले असता समोरच कागदपत्रे व पर्स अस्ताव्यस्त पडलेली त्यांना दिसली. नंतर स्वयंपाक खोलीमधील मागील दरवाजा उघडा दिसला. तसेच घराची चार ते पाच कौले काढून टाकलेली दिसली. दुसऱ्या खोलीमध्ये तीन कपाटे उघडी दिसली आणि आतील सर्व कपडे बाहेर टाकलेले होते.

पर्स मधील तीस हजार रुपये, शेवटच्या खिशामधील एक हजार रुपये, एक सोन्याची नथ चोरीला गेले. इतकेच नव्हे तर चोरट्याने चक्क २५ ते ३० किलो काजू चोरून नेल्या. दोन वर्षांपूर्वी याच प्रमाणे त्यांच्या घरात अशाच पद्धतीने चोरी झाली होती. मात्र पाच हजार रुपये चोरी गेल्याने त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली नव्हती. शनिवारी झालेल्या चोरीबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.