टोलमुक्तीबाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचे वैभव नाईक यांनी केले स्वागत

'ही भूमिका प्रत्यक्षात कृतीत आणण्याची मागणी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 26, 2026 12:15 PM
views 150  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील महामार्गाच्या टोलवरून सुरू असलेल्या जोरदार चर्चांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच 'MH-07' पासिंगच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नाही, असे स्पष्ट विधान पालकमंत्र्यांनी केले आहे. या भूमिकेचे स्वागत करत आमदार वैभव नाईक यांनी, "ही भूमिका सकारात्मक असेल तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे," असे जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल सुरू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी स्थानिकांसाठी टोलमुक्तीची भूमिका मांडली. यावर आपली प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले की, आमची मागणी हीच आहे की, गेल्या दहा वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या काळात महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले असून, रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. अपूर्ण कामामुळेच टोल सुरू करू नये, ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली आहे. पालकमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर वैभव नाईक यांनी , "सिंधुदुर्ग वासियांसाठी टोल माफीची पालकमंत्र्यांची ही भूमिका सकारात्मक असेल, तर त्यांना निश्चितच आमचा पाठिंबा असेल," असे म्हटले आहे. मात्र, ही घोषणा केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता, ती प्रत्यक्षात अंमलात आणली जावी आणि टोल सवलत खऱ्या अर्थाने लागू करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आता या टोलबाबतच्या भूमिकेवर प्रशासन काय निर्णय घेते आणि पालकमंत्र्यांच्या या घोषणेची अंमलबजावणी कशी होते, याकडे संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचे लक्ष लागले आहे.