
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. 23 एप्रिल 2026) पार पडली. जिल्हाधिकारी दालनात सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीत बोगस डॉक्टरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस उप-अधीक्षक श्वेता खाडे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन एस. पी. यादव, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मानवाधिकार समितीचे प्रतिनिधी संतोष नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरोटे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, जिल्ह्यात कोणीही बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत संशयित व्यक्तींविरोधात तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, अशा बोगस डॉक्टरांकडून उपचार घेणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून संशयितांकडून औषधोपचार घेणे टाळावे, असा इशाराही प्रशासनाने दिला. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला सुरक्षित व विश्वासार्ह ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून बोगस वैद्यकीय व्यवसायाला कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला.










