जि. प. शाळांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह..?

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 23, 2026 20:16 PM
views 32  views

सिंधुदुर्गनगरी :  जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या तसेच प्रस्तावित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्याची सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणतेही बिल अदा करू नये, असा कडक आदेश शिक्षण समितीच्या सभेत सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले. त्यामुळे सीसीटीव्ही खरेदी व्यवहारावर प्रशासनाला आता स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा उपशिक्षणाधिकारी फारुकी, सदस्य प्राची इसवलकर, नितीन राऊळ, अपर्णा सातोस्कर, यज्ञा साळगावकर, श्रावणी रावराणे, तसेच गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या तसेच प्रस्तावित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या गुणवत्तेबाबत व किंमतीबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश सभेत देण्यात आले. चौकशी अहवाल पुढील सभेत सादर करावा आणि तोपर्यंत सीसीटीव्ही संदर्भातील कोणतेही बिल अदा करू नये, असे स्पष्ट निर्देश सभापती प्रीतेश राऊळ यांनी दिले. तसेच कोणतेही देयक देण्यापूर्वी ते सभागृहासमोर ठेवण्याच्या सक्त सूचना देखील सभापतींनी दिली. सभेच्या प्रारंभी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धेतील विजेत्या शाळांचा सभापतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक साळीस्ते नं. १ (कणकवली), द्वितीय मातोंड पेंढऱ्याचिवाडी (वेंगुर्ला), तृतीय झोळंबे (दोडामार्ग) तर उत्तेजनार्थ आंबडपाल (कुडाळ), सर्जेकोट नं. १ (मालवण) आणि पुरळ (देवगड) या शाळांचा समावेश होता.

अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान काही निधी दायित्व म्हणून शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. गतवर्षी निधी उपलब्ध असतानाही तो खर्च का करण्यात आला नाही, तसेच दायित्व का निर्माण झाले याची चौकशी करावी, अशी मागणी सदस्या प्राची इसवलकर यांनी केली.

एज्युकेशन एक्स्पोसाठी ५० लाखांची तरतूद

जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या एज्युकेशन एक्स्पोचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत होता. मात्र प्रशासकीय राजवटीत हा उपक्रम राबविण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे चालू वर्षात एज्युकेशन एक्स्पो घेण्यात यावा, अशी मागणी सदस्या यज्ञा साळगावकर यांनी केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत चालू वर्षात ५० लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सभापती राऊळ यांनी दिली.