
कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर टीका केली आहे. हातिवले टोल नाका, जनआंदोलने आणि राजकीय तडजोडी या मुद्द्यांवरून नाईक यांनी राणेंना टीका केली असून, त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
निलेश राणेंनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना वैभव नाईक म्हणाले की, "निलेश राणेंनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्यापेक्षा २०२३ मधील हातिवले टोलचा विषय जास्त महत्त्वाचा आहे. निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती त्याच कंत्राटदाराने दिल्या होत्या, ज्याला हा टोल मिळाला होता. हे सर्वश्रुत आहे आणि कुणाला शंका असल्यास मी पुराव्यासह जाहिरातींचे फोटो देऊ शकतो," असा थेट दावा नाईक यांनी केला.
आपल्या आंदोलनांची भूमिका स्पष्ट करताना नाईक यांनी सांगितले की, "काजू-आंबा असो, एलईडी किंवा मुंबई-गोवा रस्ता दुरुस्तीचे आंदोलन अशी माझी आंदोलने ही नेहमी सर्वसामान्यांच्या हितासाठी असतात. माझ्यावर सातत्याने गुन्हे दाखल करण्याचे काम निलेश राणे आणि त्यांचे सहकारी करत आहेत, परंतु कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. उलट आमच्या आंदोलनामुळेच त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले, हे आमचे यश आहे."
वैभव नाईक म्हणाले, "निवडणुकीच्या वेळी रवींद्र चव्हाणांविरुद्ध मोठी भाषणे आणि आरोप केले, पण निकालानंतर त्यांच्यासमोर पुष्पगुच्छ घेऊन हात टेकले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. वैभव नाईक लोकांच्या हक्कासाठी थेट रस्त्यावर उतरतात, पण तुमची कृती पाहता तुमच्यात विरोधाची कोणतीही 'धमक' नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या आंदोलनांवर आणि केलेल्या आरोपांच्यावर शांतपणे विचार करावा," असा टोला नाईक यांनी लगावला. या टीकेमुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.










