महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना जलद सेवा द्या : जिल्हाधिकारी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 23, 2026 20:05 PM
views 12  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी विविध कायदे व धोरणांतील सुधारणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महसूल अधिकारी यांची आढावा बैठक मायनाक भंडारी सभागृहात पार पडली. या बैठकीत महसूल, निवडणूक तसेच जनगणना या विषयांचा आढावा घेण्‍यात आला. या बैठकीदरम्‍यान महसूल व वनविभाग महराष्‍ट्र शासन यांचेकडून नव्‍याने निर्गमित करण्‍यात आलेले  विविध शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना याबाबत उपजिल्‍हाधिकारी तसेच तहसिलदार यांनी सादरीकरण केले.   बैठकीदरम्यान महसूल विभागाशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, अकृषक परवानगी प्रक्रियेतील सुलभीकरण, सनद वितरण, तसेच अकृषक आकारणी रद्द करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी यांचा समावेश होता. याशिवाय कुळ कायद्यातील सुधारणा, सिलिंगमधील जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी, तसेच कलम ८५ अंतर्गत विभाजनी प्रक्रियेबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.

१ नोव्हेंबर २०११ पर्यंतच्या निवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलन, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शेतजमिनींच्या पोटहिस्स्यांची अचूक मोजणी करून अधिकार अभिलेखात दुरुस्ती करणे, तसेच भाडेपट्टा किंवा कबजेहक्काने दिलेल्या जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याच्या सुधारणा यावरही विशेष भर देण्यात आला.

या सर्व सुधारणा केवळ धोरणात्मक न राहता प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्देशित केले. 

उपरोक्‍त सुधारणा या जिल्‍ह्यामध्‍ये राबविताना ज्‍या अडचणी येणार आहेत त्‍यांची देखील चर्चा या बैठकीदरम्‍यान झाली. त्‍या अनुषंगाने उपरोक्‍त सुधारणांमध्‍ये दुरुस्‍ती करण्‍यासाठीच्‍या सुचना महसूल विभागास मंत्रालय स्‍तरावर कळविण्‍याबाबतच्‍या सुचना संबंधित विभागांना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्या. उपरोक्‍त सर्व सुधारणा या सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या जमिन विषयक तक्रारींचे निराकरण करण्‍याकर‍ीता प्राधान्‍याने महसूल मंत्र्यांकडून झाल्‍या असल्‍याने या सुधारणा मोठ्या प्रमाणात या जिल्‍ह्यात राबविण्‍यात याव्‍यात तसेच वरील सर्व बाबींचा आढावा नियमितपणे घेणार असल्‍याचेही  जिल्‍हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.