सिंधुदुर्गातील ऐतिहासिक मंदिरांना मिळणार नवसंजीवनी

महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पुढाकार ठरतोय दिशादर्शक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 20, 2026 14:30 PM
views 308  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नसून ती आपल्या संस्कृतीची अस्मिता आहेत. मात्र, काळानुसार आणि दुर्दैवाने अंतर्गत मतभेद व मानपानावरून होणाऱ्या वादांमुळे अनेक मंदिरे बंद पडली होती. या ऐतिहासिक संस्कृतीचे जतन करणे ही आज काळाची गरज बनली असून, 'महाराष्ट्र मंदिर महासंघ' याच दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी पाऊल उचलत आहे.

अनेक मंदिरे मानपानाच्या वादात अडकल्यामुळे आणि न्यायालयात खटले प्रलंबित असल्यामुळे भाविकांसाठी बंद होती. ही स्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने गांभीर्याने पुढाकार घेतला आहे. गावातील मानकरी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांना एकत्र आणून, त्यांच्यात संवाद घडवून वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याचे काम महासंघ करत आहे. विशेष म्हणजे, न्यायालयात असलेले खटले मिटवून मंदिरांचे दरवाजे पुन्हा भाविकांसाठी उघडण्याचे मोठे धाडस त्यांनी दाखवले आहे.

हिंदू धर्माची जनजागृती करणे आणि आपल्या धार्मिक वारशाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. केवळ मंदिरे उघडणे हा एकमेव उद्देश नसून, मंदिरांबद्दल लोकांमध्ये ओढ आणि गोडी निर्माण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी महासंघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत, जेणेकरून बंद पडलेली मंदिरे पुन्हा भाविकांच्या गर्दीने आणि चैतन्याने फुलून उठतील.

ओसरगाव (ता. कणकवली): श्री देव रावळनाथ मंदिर (पडवे) आणि श्री लिंग माउली मंदिर (ओसरगाव) येथील अनेक वर्षांपासूनचा वाद महासंघाच्या मध्यस्थीमुळे मिटला आहे.

घारपी उडेलील येथे गेल्या २० वर्षांपासून बंद असलेले मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले झाले आहे.

केवळ व्यवस्थापन नाही, तर मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी महासंघाने 'ड्रेस कोड' सारखे उपक्रम राबवून मंदिरातील आध्यात्मिक वातावरण जपण्यावर भर दिला आहे. सामूहिक आरती आणि नियमित धार्मिक कार्यक्रमांमुळे आता मंदिरे पुन्हा प्रकाशझोतात आली आहेत. "मंदिर संस्कृती टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र येऊन मंदिरांच्या रक्षणासाठी आणि हिंदू धर्माच्या जनजागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे," अशी भावना यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महासंघाच्या या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे शरद राऊळ, यशवंत परब, राजेंद्र पाटील, घनश्याम राणे, रामचंद्र परब, शिवराम गावडे, दीपक गावडे, विलास गावडे, दत्ताराम राऊळ, जनार्दन भागवत, सुनील राऊळ, जीवन केसरकर आधी उपस्थित होते.