संघटन सृजन अभियानातून काँग्रेसची ताकद वाढविणार

जिल्हाध्यक्ष निवड कार्यकर्त्यांच्या मतांवर | पत्रकार परिषदेत दानिश अब्रार यांची माहिती
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 16, 2026 20:54 PM
views 13  views

सिंधुदुर्गनगरी :  पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्ह्यात व्यापक पातळीवर संवाद व बैठका घेतल्या जाणार असून, जिल्हाध्यक्ष निवडही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित केली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा जिल्हा निरीक्षक दानिश अब्रार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ओरोस येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक शशांक बावचकर, अजिंक्य देसाई, प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, साक्षी वंजारी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना शशांक बावनकर म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात संघटन सृजन अभियान राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने अब्रार हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. या अभियानांतर्गत तालुकानिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.

यावेळी बोलताना दानिश अब्रार म्हणाले, “जिल्ह्यात प्रथमच येण्याची संधी मिळाली आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे. वरून लादली जाणारी नावे संघटनेचे खच्चीकरण करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊनच नेतृत्वाची निवड केली जाईल.” ते पुढे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष पदासाठी सहा नावे सुचविण्यात येणार असून अंतिम निर्णय पक्षाध्यक्षांकडून घेतला जाईल. जिल्हाध्यक्ष निवडीनंतर ब्लॉक स्तरावरील नियुक्त्याही करण्यात येणार आहेत. सहा टप्प्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानातील पाच टप्पे पूर्ण झाले असून हे अभियान पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. कोकणात सध्या राजापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात असल्याचा उल्लेख करत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे चिन्ह जिल्ह्यातील प्रत्येक भागात प्रत्येक घरघरात पोहोचविण्यासाठी संघटन बळकटीकरणावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.