
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तास्थापनेची प्रतीक्षा अखेर संपली असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर ९ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी आणि आठ पंचायत समित्यांच्या एकूण १०० जागांसाठी मतदान झाले होते. निकालात भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीने जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
आता सत्तास्थापनेचा पुढील टप्पा निश्चित झाला आहे. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संबंधित पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष बैठका होणार आहेत. त्यानंतर १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची बैठक पार पडणार आहे.
तब्बल तीन वर्षांनंतर लोकप्रतिनिधी सत्तेत
गेल्या तीन वर्षे ११ महिने जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट लागू होती. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधींची अनुपस्थिती जाणवत होती. आता सार्वत्रिक निवडणूक पार पडून सत्तास्थापना निश्चित झाल्याने तब्बल तीन वर्षे ११ महिने २३ दिवसांनंतर जिल्हा परिषदेला अध्यक्ष लाभणार आहेत.
तसेच पंचायत समित्यांवरही तीन वर्षे ११ महिने १५ दिवसांनंतर सभापती व उपसभापती विराजमान होणार असल्याने स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रियेला नवे बळ मिळणार आहे. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग येणार असून, अध्यक्ष व सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










