कणकवली न.पं. बजेटच्या सभेत पारकर - हर्णेंमध्ये खडाजंगी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 27, 2026 20:41 PM
views 122  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या शुक्रवारी झालेल्या बजेटच्या बैठकीत नगराध्यक्ष संदेश पारकर आणि विरोधी स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. परिणामी ही सभा तब्बल दोन तास सुरू होती. 

बंडू हर्णे यांनी सभेच्या सुरुवातीला लेखापाल यांनी मांडलेल्या बजेटच्या अनेक मुद्द्यांवर जोरदार आक्षेप घेतला. एकूण नगरसेवकांपैकी 10 नगरसेवक नवीन असताना घाईगडबडीमध्ये सभा आयोजित करण्यात आल्याचा आक्षेप हर्णे यांनी घेतला. तर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी एकवेळेस त्यांना समजावून घ्या अशी विनंती सभागृहाला केली. नगराध्यक्ष संदेश पारकर व बंडू हर्णे यांच्यातील  वाक्युद्ध सभेत सुरुवातीपासून सुरू होते. नगरसेविका आर्या राणे यांनी वृक्षकर आणि शिक्षणकर कुठे खर्च  करता? असा सवाल केला. 

कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवाकरता दहा लाख रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली. मात्र त्याला नगरसेवक मेघा गांगण, बंडू हर्णे, सुप्रिया नलावडे यांनी आक्षेप घेतला. जर लोकवर्गणीसाठी दहा टक्के रक्कम तुम्हाला भरताना नगरपंचायतीची स्थिती नाही असे वाटत असेल तर तुम्ही एवढा जनतेचा पैसा का उधळता? असा सवाल हर्णे यांनी केला. तर सुप्रिया नलावडे यांनी मागील पाच वर्षांमध्ये असा निधी खर्च केलेला बजेटमध्ये दिसून येत नाही, असा मुद्दा उपस्थित केला. मात्र जनतेच्या सोयीसाठी पर्यटन महोत्सव करतो. तुम्ही दहा लाख रुपये आणून द्या, नगरपंचायतीच्या पैशाला हात लावत नाही. तसेच दहा टक्के लोकवर्गणी भरण्यासाठी विकास ्कामांकरता नगरपंचायत कमी पडणार नाही, असे संदेश पारकर यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्या खडाजंगी झाली. मात्र विरोधक नगरसेवकांची खर्च तरतूद न करण्याची मागणी पारकर यांनी फेटाळून लावत दहा लाखाची तरतूद केली. यावेळी बंडू हर्णे यांनी, तुम्ही तर शासनाकडून 200 कोटीची आणणार, मग 10 लाख नगरपंचायतचे का खर्च करता? असा सवाल केला.  मात्र पारकर  यांनी डिसेंबर किंवा एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव करणार असल्याचे सांगत सदरची मागणी फेटाळून लावली. 

यावेळी श्री पारकर यांनी यापूर्वी नगराध्यक्ष असताना केलेले बोटिंग प्रकल्प व पर्यटन केंद्र बंद पडले, असा आरोप हर्णे यांनी केला. तर हे प्रकल्प लवकरच सुरू केले जातील व तुम्ही सुरू केलेला धबधबा देखील बंद पडला जाणार नाही, असे पारकर यांनी सांगितले. 

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीच्या प्रसंगी उगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील  यांच्यासहित  नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळू पारकर, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, बंडू हर्णे, राकेश राणे, संजय कामतेकर, स्वप्निल राणे, मेघा गांगण, मेघा सावंत, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत, आदी उपस्थित होते.