
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्यावासीयांना चांगली आरोग्य सेवा मिळावी याकरिता पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ३५० हून अधिक रुग्णांनी सहभाग घेतला आहे. या कॅम्पसाठी स्पेशालिस्ट डाॅक्टर बोलवले आहेत, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व ‘मल्टी’स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात होते. या कॅम्पला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सई धुरी, शासकीय मेडिकल काॅलेजचे डीन डॉ. अनंत दवंगे , कणकवली रुग्णालयाच्या अधीक्षक डाॅ. नीिलमा इनामदार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील, डॉ. माधव उबाळे, डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेट्ये, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, इंचार्ज सिस्टर एस. तिवरेकर यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेद्वारे जिल्हावासायांना चांगली सेवा देण्याचा मानस आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतून वैद्यकीय सेवा दिली जात आहे. त्यापेक्षा अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन केले आहे. वैद्यकीय सेवेची अनेकांना गरज असते ही गरज या कॅम्पद्वारे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कॅम्पसाठी जिल्ह्यातील व जिल्हाबाहेर स्पेशालिस्ट डाॅक्टर आलेले आहेत. जिल्ह्यातील पहिला मोठा हा कॅम्प असून दर तीन महिन्यांनी अशाप्रकाराचा कॅम्प घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हाप्रशासन काम करीत आहे. हा कॅम्प घेतल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, असे श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले. मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे निटनेटके नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.
शिबिरात ११३४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.ह्रदयरोग, शल्यचिकित्सा, पोटाचे विकार, स्त्रीरोग तज्ञ, कर्करोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बालअस्थिरोग तज्ञ , मूत्रविकार तज्ञ ,कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मार्फत सेवा देण्यात आल्या. शिबिरात स्पेशालिस्ट २० डॉक्टर उपस्थित होते. यात यूएसजी 152, सिटीस्कॅन 64, रक्त तपासणी 754 2डी इको 119, एक्सरे 151, ईसीजी122 तपासण्या करण्यात आल्या.










