१३४ जणांना तत्काळ शस्त्र जमा करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 15, 2026 19:38 PM
views 15  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा १३४ शस्त्र परवानधारकांना तत्काळ शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या निवडणुकीत तब्बल १४,१५३ मतदार दुबार असून त्यांना एकच ठिकाणी मतदान करता येणार असून ते ठिकाण निवडण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची निवडणूक पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक पार पडल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणल्या की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी ८ तालुक्यात प्रत्येकी एक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने चालणार आहे. या निवडणुकीसाठी ५ लाख ९९ हजार ५६४ नागरिक असून यात ३,०१,९०३ पुरुष, २,९९,९५६ महिला तर १ तृतीयपंथी मतदार आहे. निवडणुकीसाठी ८७० मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर आवश्यक कर्मचारी वर्ग, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

१३४ शस्त्रे तात्काळ जमा करण्याचे आदेश 

निवडणूक पार्श्वभूमीवर ज्या शस्त्र परवानधारकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा १३४ शस्त्र परवानधारकांना तत्काळ शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उर्वरित परवानाधारकांकडूनही शस्त्रे जमा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात १४,१५३ दुबार मतदार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल १४ हजार १५३ मतदार हे दुबार मतदार आहेत. मात्र त्यांना मतदानाच्या वेळी एकच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्यांना आवश्यक असलेले मतदान केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिबंधात्मक कारवाई सुरू

निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात आंतरराज्य सीमा भागात १० ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहे. पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी सांगितले 

६५ केंद्रांवर नेटवर्क नाही

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ८७० मतदान केंद्रे आहेत. यापैकी ६५ मतदान केंद्रांवर नेटवर्क नसून या केंद्रावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.