सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 02, 2026 19:51 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र पोलीस दलाचा ६५ वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त कायदा व सुव्यवस्था, नागरिकांचे संरक्षण, संविधानिक कर्तव्यपालन तसेच महिलांचा सन्मान या मूल्यांना सर्वोच्च स्थान देण्याचा संकल्प पोलीस दलाने यावेळी दृढ केला. या निमित्ताने पोलीस वर्धापन दिनाची हर्षोल्हासपूर्ण परेड पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग  डॉ. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली. या परेडद्वारे महाराष्ट्र पोलीस दलाची शिस्त, एकात्मता व कर्तव्यनिष्ठा यांचे प्रभावी दर्शन घडले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  सुधीर देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात पोलीस हा केवळ गणवेश नसून तो जबाबदारी, विश्वास आणि धैर्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. स्वतःच्या सुरक्षेपेक्षा नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे पोलीस हेच खरे सेवक असून आज गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, संघटित गुन्हेगारी यांसारख्या आव्हानांना सामोरे जाताना तंत्रज्ञानासोबतच मानवी संवेदना, नैतिक मूल्ये व कायद्यावरील निष्ठा कायम ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे योगदान समाजात शांतता व कायद्याचा आदर टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असून पोलीस दलावरील जनतेचा विश्वास हीच त्यांची खरी ताकद असल्याचे सांगत त्यांनी पोलीस दलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. परेडनंतर उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधुनिक शस्त्रसज्जतेचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती देण्यात आली. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास  डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, श्रीम. श्वेता खांडे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय), श्री. धनश्याम आडाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परेडचे नेतृत्व श्री. रामदास पालशेतकर, राखीव पोलीस निरीक्षक व निशान टोलीचे नेतृत्व श्री. सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांनी केले.