
देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदैवत श्री देवी भगवती मातेचा वार्षिक जत्रोत्सव आज, २ जानेवारीपासून ६ जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुणगे सडेवाडी येथील धोकादायक रस्त्याचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या पुढाकाराने व सहकार्याने मार्गी लागला असून भाविकांन ची होणारी गैरसोय यामुळे दूर होणार आहे.
मुणगे सडेवाडी येथील रस्ता अत्यंत दयनीय आणि धोकादायक स्थितीत झाला होता.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढल्याने वाहन चालवताना अडथळा निर्माण होत होता.श्रीदेवी भगवती जत्रोत्सवाच्या काळात येथे भाविकांची वर्दळ असते, ही बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी हिंदळे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली होती.
त्यांनी स्वखर्चातून भाविकांसाठी रस्त्याची सोय करून देऊन ही गैरसोय दूर केली. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता, मनोज जाधव यांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता तातडीने पावले उचलली. त्यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले आहे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला, तसेच रस्त्यावर विखुरलेली मोठी खडी हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करण्यात आला आहे. आता हा रस्ता वाहनचालकांसाठी आणि पायी चालणाऱ्या भाविकांसाठी पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. याविषयी मुणगे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यात्क करण्यात आले. ऐन जत्रोत्सवाच्या तोंडावर मनोज जाधव यांनी दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वामुळे ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.










