
सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात. जर आपण पर्यटकांना स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे उपलब्ध करून दिले, तर भविष्यात यापेक्षाही अधिक प्रमाणात पर्यटक जिल्ह्याला भेट देतील, असा विश्वास जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या जिल्हास्तरीय समुद्र किनारा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत मेढा, तालुका वेंगुर्ला येथे करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत मेढाचे सरपंच श्री. अवधुत रेगे, पंचायत समिती वेंगुर्लाचे गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कृषी अधिकारी श्री. दिंगशांत कोळप, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संतोष पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शरद शिंदे तसेच श्री. रुपाजी किनळेकर, श्री. मनीष पडेत, श्रीम. स्नेहल पिंगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण ३३ समुद्र किनाऱ्यांवर एकाच दिवशी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आले. या अभियानात एकूण १७७९ किलो कचरा गोळा करण्यात आला असून त्यापैकी १०३५ किलो प्लास्टिक कचरा आहे. देवगड तालुक्यातील १३ समुद्र किनाऱ्यांवर ४०३ नागरिकांच्या उपस्थितीत ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला. मालवण तालुक्यात १६३ नागरिकांच्या सहभागातून ९ समुद्र किनारे स्वच्छ करण्यात येऊन ९२३ किलो कचरा जमा करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील ११ समुद्र किनाऱ्यांवर ३३७ नागरिकांनी पुढाकार घेत ३५६ किलो कचरा गोळा केला. संकलित कचऱ्याची ग्रामपंचायतींच्या माध्यमातून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.










