
सिंधुदुर्गनगरी : सरसकट वनीकरण करणे, बिजगोळे जंगलात टाकणे, अशा वरवरच्या उपायांनी जंगले वाढवता येत नाहीत. नष्ट झालेल्या जंगलाचे मूळ स्वरुपात पुनरुज्जीवन ही खूप गुंतागुंतीची, प्रदीर्घ काळ चालणारी आणि गांभीर्याने घेण्याची शास्त्रीय बाब आहे, असे प्रतिपादन 'जंगलाचे डॉक्टर’ मिलिंद पाटील यांनी येथे केले.
‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या ‘गप्पागोष्टी’ या दहाव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठाचे समन्वयक सतीश लळीत यांनी प्रास्ताविकामध्ये श्री. पाटील यांचा परिचय करुन दिल्यावर कार्यक्रमाची संकल्पना सांगितली आणि कोकणातील व पश्चिम घाटातील पर्यावरणाचे प्रश्न अधोरेखित केले. यावेळी ग्रंथभेट देऊन श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील यांनी गप्पा आणि नंतरची प्रश्नोत्तरे यात सुमारे दोन तास रसिकांना मंत्रमुग्ध केले. पडद्यावर स्लाईडच्या मदतीने सदाहरित वर्षावने म्हणजे काय, यापासून त्यांनी गप्पांना सुरुवात केली. विशेषता पश्चिम घाटातील म्हणजे सह्याद्रीतील सदाहरित वर्षावनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. जंगलाचे पुनरुज्जीवन, बांबू लागवड, डंखरहित मधमाशीपालन, प्रदेशनिष्ठ वनस्पतींची रोपवाटिका या क्षेत्रात केलेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली.
पाटील म्हणाले की, वनसंवर्धन किंवा वन पुनरुज्जीवनाबाबत काहीही माहिती नसलेल्या पर्यावरणप्रेमींना उत आला आहे. केवळ बीजगोळे जंगलात टाकणे किंवा झाडे लावणे म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे. जंगले मूळ स्वरुपात आणण्यासाठी आधी मूळ जंगले कोणत्या प्रकारची होती, हे समजून घेतले पाहिजे. कमीत कमी मानवी हस्तक्षेप असलेले जंगल शोधुन त्याचा अभ्यास केला पाहिजे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे ग्रीन कव्हर आहे, त्यापैकी जेमतेम एक ते दीड टक्के क्षेत्र अशा प्रकारचे उरले आहे. आपल्याकडील सदाहरित वर्षांवनांमध्ये ४३० प्रदेशनिष्ठ वृक्षप्रजातींची नोंद आहे. त्यापैकी दीडशेहून अधिक प्रजाती अद्याप अज्ञात आहेत. त्या शोधण्याचे आमचे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जंगलांचे पुनरुज्जीवन करण्याआधी जंगल वाचायला शिकावे लागते, असे सांगुन श्री. पाटील म्हणाले की, पश्चिम घाटात जमीन विकत घेऊन २०१९पासुन असा एक प्रयोग आम्ही करीत आहोत. यासाठी सहसा न आढळणाऱ्या वृक्षांची रोपे बनवणारी नर्सरी तयार केली आहे. दरवर्षी एक लाख क्षमता असलेल्या या रोपवाटिकेत आम्ही दरवर्षी अशा प्रकारची वेगवेगळ्या १२० असाधारण प्रजातींची ७० हजार रोपे तयार करतो. मात्र ही रोपे घेऊन त्यांची लागवड करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. नागरी भागाच्या विकास आराखड्याप्रमाणे पर्यावरणीय परिसंस्था विकास आराखडा शासन स्तरावर तयार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
कोकणात देवराई, राखणदार अशा प्रकारच्या मानवी श्रद्धांशी निगडीत संकल्पना आहेत. देवाच्या भीतीमुळे का होईना, पण अशा आकृतीबंधांमुळे जर वृक्षवेली, जंगले टिकणार असतील तर याबाबतीत श्रद्धा-अंधश्रद्धा असे प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही. समाजाच्या सहभागातून अशा प्रयत्नांना मोठे बळ मिळेल, असे मत त्यांनी मांडले. श्रोत्यांच्या विविध प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. डॉ. सई लळीत यांनी श्री. पाटील यांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले.










