
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून ओरोस येथील रिक्षा लावण्याच्या विषयावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy. RTO) विजय काळे यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष लक्ष घालून सकारात्मक मार्ग काढल्याने रिक्षा लावण्याचा वाद मिटला असून, सर्वांना रोजगाराची समान संधी उपलब्ध झाली आहे. ओरोस येथे रिक्षा लावण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाले होते, यावरून वाद चिघळण्याची चिन्हे होती.
वादाची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी रिक्षा स्टैंड वर आपले कार्यालयीन सहकारी पाठव संबंधित वाद मिटवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यांनी चालकांशी सविस्तर चर्चा करून अत्यंत कुशलतेने या प्रश्नात सुवर्णमध्य काढला. ज्यांच्याकडे स्थानिक परमिट आहे, अशा कोणत्याही रिक्षा चालकाला रिक्षा लावण्यापासून अटकाव केला जाऊ नये. प्रत्येक अधिकृत रिक्षा चालकाला आपला व्यवसाय आणि रोजगार करण्याचा समान हक्क आहे. वादापेक्षा रिक्षा चालकांची संघटनात्मक एकजूट कायम राखणे व्यवसायासाठी हिताचे आहे.
विजय काळे यांनी दिलेल्या समज आणि मार्गदर्शनानंतर रिक्षा चालकांनी वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओ प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि समंजस भूमिकेमुळे ओरोस परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत झाली आहे. "प्रशासकीय अधिकाऱ्याने केवळ नियमांवर बोट न ठेवता, सामाजिक समतोल राखून हा प्रश्न मार्गी लावला," अशा भावना रिक्षा चालकांकडून व्यक्त होत आहेत.










