
दोडामार्ग : हेवाळे येथील मूळ श्रीराम मंदिरात द्वितीय प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते ९.०० वाजता श्रीराम-सीता पंचायतन देवदेवतांची पूजा व अभिषेक करण्यात येणार असून, त्यानंतर ९.०० ते ११.०० वाजता श्रीराम नामजप यज्ञ होणार आहे. सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत प्रभू श्रीराम महामंत्राचा जप, आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १.०० ते ४.०० महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी रामभक्तांचे सुमधुर भजन होणार असून, व सातेरी मायदेव वारकरी मंडळ, हळवणे (बार्देश–गोवा) यांचा हरिपाठ सादर होणार आहे. त्यानंतर रात्री १०.०० वाजता श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ, पिंपळे–लाजाडे (वेंगुर्ले) यांचे “नागा – भस्म टिळक” हे पौराणिक रहस्यमय दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या धार्मिक सोहळ्यास हेवाळे ग्रामस्थ व श्री सातरी मायदेव युवा मंडळ, हेवाळे यांच्या वतीने भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










