स्त्रीवाद ही पाश्चात संकल्पना नसून या मातीतली संकल्पना : प्रा. डॉ. राही श्रुती गणेश

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 28, 2025 18:55 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्त्रीमुक्ती दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महिला परिषदेत,स्त्रीवाद ही पाश्चात्त्य संकल्पना नाही तर ती या मातीतली संकल्पना आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ.राही श्रुती गणेश यांनी  येथील शरद कृषी भवन येथे केले. त्या दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महिला परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.या महिला परिषदेचे उद्घाटन फेडरेशनचे अध्यक्ष मा. शामसुंदर जाधव यांचे हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच पोलीस निरीक्षक शेखर लाव्हे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या परिषदेसाठी,मिनल वानखेडे-मुंबई,फेडरेशनचे कार्याध्यक्ष समाजभुषण संदीप कदम,उपाध्यक्ष पर्णवी जाधव,सचिव अंकुश कदम,सदस्य आनंद धामापूरकर, मधुकर तळवणेकर, संजय कदम, अभय पावसकर,डि .के.पडेलकर, सामाजिक कार्यकर्ते विजय वरेरकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, पत्रकार मोहन जाधव,शारदा कांबळे, गोव्याहून मल्लिका माटे, मुंबईहून सत्यजित तांबे,स्थानिक कार्यकर्ते- प्रवीण कदम, विजय जाधव, रश्मी पडेलकर,अर्पिता साळुंखे , सरपंच पी के चौकेकर, प्रमोद कासले  व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उद्घाटक,प्रमुख मार्गदर्शक, विशेष अतिथी व मान्यवरांच्या हस्ते बहुजन महानायक/ महानायीकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी येथील बौद्ध धम्म सेवा संघ,रानबांबुळी महिला मंडळाच्या  कलावंतांनी वंदन गीत व धम्मगीत सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. तद्नंतर सभाध्यक्षांकडून मान्यवरांचे पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.  संस्थेचे कार्याध्यक्ष समाजभुषण संदीप कदम यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व बौद्ध संघटनांना एका झेंड्या खाली आणण्यासाठी बुद्धीस्ट  फेडरेशन काम करत आहे . यापुर्वी महाबोधी महाविहारासाठी सिंधुदुर्ग नगरी येथे भव्य मोर्चा आयोजित करण्यात  आला होता तसेच कणवली येथे बौद्ध विहाराच्या  पटांगणात धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती . त्याचाच पुढचा म्हणजे आजची महिला परिषद होत आहे . सर्व संघटनांच्या महिला पदाधिकारी यांची विविध चळवळींच्या योगदानासाठी संवाद व्हावा . महिलांच्या नेत्वृत्व गुणांना वाव मिळावा तसेच जिल्हयातील महिलांमध्ये सुसंवाद व्हावा या हेतुने ही महिला परिषद होत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले .उद्घाटन सत्रामध्ये तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या विशेष ठेव योजना व कर्ज योजनांविषयी उपस्थितांना  माहिती देण्यात आली. त्यावेळी पतसंस्थेचे चेअरमन अरविंद वळंजु उपस्थित होते .

 उद्घाटन सत्राचं अध्यक्षस्थान फेडरेशनचे अध्यक्ष शामसुंदर जाधव ओंबळकर , यांनी भूषविले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना त्यांनी जिल्हातील सर्व बौद्ध महिलांची  जिल्ह्यात  होणारी पहिली महिला परिषद असल्या ने  मला फार  आनंद होत असल्याचे सांगितले .यापुढे ही जिल्हयातील  महिलांसाठी विविध मेळावे , उपक्रम आणि परिषदा घेवुन बौद्ध महिलांची एक जुट  करणार असल्याचे  सांगितले . महिला सक्रिय पणे सामाजिक नी सांस्कृतिक चळवळीत सक्रिय  झाल्या तर परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही असे ते म्हणाले .उद्घाटन सत्रानंतर 'भारतीय स्त्री मुक्ती आंदोलनाची क्रांतिकारी परंपरा आणि संविधान' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसवांदाचे  अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या रश्मी पडेलकर यांनी भूषविले. या परिसंवादामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. राही श्रुती गणेश, पुणे यांनी आपल्या भाषणात, विषमतेमुळे समाजात तयार झालेल्या उतरंडी मधील खालच्या थरातील माणसांना अपमानास्पद वागणूक मिळते, काही संधी त्यांना जन्मापासून नाकारल्या जातात. त्यामुळे अशी उतरंड अन्यायकारक असते. एकीकडे समतेचा नैतिक मूल्य म्हणून जगभरात केलेला स्वीकार आणि दुसरीकडे आपल्या आजूबाजूला दिसणारी विषमता अशा  विरोधाभासामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जाती संस्थेने शूद्र -अतिशूद्रांना आणि पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांना बंधनांमध्ये बांधून ठेवलं होतं. समाजातल्या एका मोठ्या भागाचं या व्यवस्थांमधून विविध प्रकारे शोषण होत होतं, त्यामुळे पितृसंस्थेला विरोध केल्याशिवाय पर्याय राहत नाही. इतिहासाचं सम्यक आकलन आणि न्याय भविष्याचा वेध घेत आजच्या समाजातली धोरणं आखली जावीत. संविधानाने दिलेल्या मताधिकारा विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, भारताच्या 1951- 52  मधील पहिल्या  लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादी तयार करणे हे मोठं कठीण काम होतं. या मतदार याद्यांमध्ये अनेक स्त्रियांनी आपली खरी नावंच सांगितली नव्हती. त्यांनी आपल्या नवऱ्याचं किंवा वडिलांचं नाव या याद्यांमध्ये दिलं. मात्र या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावे वरून अमुक ची बायको' ,'अमुकची मुलगी' असे उल्लेख असतानाही कोणालाही मताधिकारापासून रोखलं गेलं नाही यावरून आपल्या संविधानकर्त्यांची दूरदृष्टी आणि लोकशाहीप्रती असणारी निष्ठा दिसून येते. तर परिसंवादाच्या दुसऱ्या मार्गदर्शक प्रा. मीनल वानखेडे, मुंबई यांनी आपल्या भाषणात, इ.स. सहाव्या शतकात तथागत गौतम बुद्धांनी भिक्कुनी संघाची स्थापना करून स्त्री- पुरुष समानतेची सुरुवात केली. सद्यस्थितीत राजकीय क्षेत्रात स्त्रियांचा नगण्य हस्तक्षेप विचार करण्यास लावणारा असून स्त्रियांनी स्वतः पुढाकार घेऊन राजकारणात 50 टक्के प्रतिनिधीत्व करावे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक चळवळीमध्ये सहभाग घ्यावा कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतातील समस्त स्त्रियांसाठी मुक्तीची कवाडे खुली करून दिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्री-सूत्रीवर कार्य करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फेडरेशनच्या माध्यमातून एक आदर्श चळवळीची कार्यप्रणाली संपूर्ण आंबेडकरी समाजाला दिशादर्शक ठरेल असे मत  त्यांनी व्यक्त केले.   महिला परिषदेच्या  पहिल्या सत्राच्या अध्यक्षा रश्मी पडेलकर यांनी ओघवत्या भाषणात महिलांची एकजुट , सहभाग ,नी धम्म चळवळ वृध्दींगत  होण्यासाठी  महिलांची भूमिका या बाबतीत आपली मत मांडली . उद्घाटन सत्र व परिसंवादाचे सूत्रसंचालन/आभार, जिल्हा समन्वयक शाळा मान्यता जि .प. ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी  रूपाली कदम यांनी केले. दुपार नंतर तिसऱ्या सत्राची सुरवात अश्वघोष सांस्कृतिक कला मंच, पावशी यांनी एक बहारदार कार्यक्रम सादर करून केली.तिसऱ्या सत्रातील खुल्या चर्चेत 'समतेच्या लढाईत स्त्रियांची भूमिका: काल, आज आणि उद्या' या विषयावर जिल्ह्यातील नेतृत्वशील महिलांनी सहभाग घेतला.यामध्ये देवगडहून संजीवनी गिरकर, पूजा जाधव, सुरभी पुरळकर, वैभववाडीहून शारदा कांबळे, दोडामार्गहून सिद्धी आयनोडकर, वेंगुर्लेहून संचिता जाधव, साक्षी खानोलकर यांनी आपले विचार व्यक्त केले.खुल्या सत्राचे अध्यक्षस्थान संस्थेच्या उपाध्यक्ष पर्णवि जाधव यांनी भूषविले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्पिता साळुंखे यांनी केले. या सत्रात शर्वरी कदम व नेत्रा कदम यांनी कविता वाचन केले तर पंचशील महिला मंडळ सिद्धार्थ नगर मिठमुंबरी यांनी भीम गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. समारोप सत्रामध्ये  फेडरेशनचे सचिव अंकुश कदम यांनी ठराव वाचन केले. कार्यक्रमासाठी हॉल,चहा- नाश्ता इत्यादी व्यवस्था मान.विजय वरेरकर यांनी केली. आभार अर्पिता साळूंखे यांनी व्यक्त केले