साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज : डॉ. सई धुरी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 18, 2026 21:38 PM
views 63  views

सिंधुदुर्गनगरी :  आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली असून साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियंत्रण कक्ष, आपत्कालीन प्रतिसाद पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा आरोग्य अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी साथरोग नियंत्रण तज्ञ डॉ. प्रशांत सौदी, प्रशासन अधिकारी नीलेश मठकर आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. सई धुरी म्हणाल्या की, जिल्हास्तरावर एक, तालुकास्तरावर आठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३८ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ अर्थात आरआरटी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी अद्ययावत करण्यात आली असून औषधसाठा, आरोग्य किट आणि ओआरएस पाकिटांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. क्लोरीन पावडरचे नमुनेही तपासले जात आहेत. ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांच्या सर्वेक्षणानुसार लाल, हिरवे आणि पिवळे कार्ड देण्यात येत आहेत. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून डास निर्मूलनासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. पावसाळ्यातील संभाव्य आजारांचा विचार करून सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तीन महिन्यांचा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच १२५९ अँटी स्नेक व्हेनम आणि ३८८१ अँटी रेबिज लसींचा साठाही ठेवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १०८ आणि १०२ रुग्णवाहिकांचे स्ट्रॅटेजिक लोकेशननुसार नियोजन करण्यात आले असून १२ ठिकाणी १०८ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. दुर्गम भागांसाठी फिरते आरोग्य पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी सोशल मीडिया, स्थानिक प्रसारमाध्यमे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ताप आणि लेप्टोस्पायरोसिससंदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली जात असून पाणी नमुन्यांची नियमित तपासणी प्रयोगशाळांमार्फत करण्यात येत आहे. आरोग्य शिबिरे आणि सिंधु आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही डॉ. धुरी यांनी स्पष्ट केले.