
कणकवली : कणकवली शहरातील 2 तरुणींची एका सलुनमध्ये काम करणा-या परप्रांतीयांकडून छेडछाड करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित सलुनच्या संचालिका यांनी दिलेल्या फिर्यादिनंतर कणकवलीतील 6 तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या विरोधात कणकवली शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरिक्षक तेजस नलवडे यांना सोमवारी सायंकाळी जाब विचारला. यावेळी पोलीस निरिक्षक श्री. नलवडे यांनी दाखल झालेले गुन्हे तपासात कमी करण्यात येतील. संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार ते गुन्हे दाखल केले गेल्याचे सांगितले. वादग्रस्त सलुन बंद करत त्या महिलेसह संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी करत ठिय्या मांडण्याचा इशारा दिला.
कणकवली तेली आळी संत जगनाडे महाराज चौक - झेंडा चौक येथुन बाजारपेठ मार्गे कणकवली पोलीस ठाण्यावर काळ्या फिती लावून कणकवलीकरांनी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध विषय लिहिलेले निषेधाचे फलक हातात धरले होते. आंदोलनकर्ते पोलीस ठाणे परिसरात पोहोचताच कणकवली पोलीस निरिक्षक तेजस नलवडे मोर्चेकरांना सामोरे गेले.यावेळी युवतींची परप्रांतीयांकडून छेडछाड केली असताना संबंधित घटना उघडकीस आणणा-या युवकांविरोधात गुन्हे दाखल का केलात ? अशी विचारणा आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरिक्षकांना केली. त्यावेळी त्यांनी न्यायालयाची सुचना आली होती. तसेच संबंधित महिलेची फिर्याद या युवकांविरोधात आहे असे सांगितले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी संतप्त भूमिका घेत आम्ही देखील फिर्याद देतो , त्याचप्रमाणे संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करा , अशी मागणी केली. त्यावर पोलीस निरिक्षक निरुत्तर झाले होते, त्यावर आपली फिर्याद द्या आम्ही कायदेशीर कारवाई करु असे सांगितले.
या चर्चेत नगराध्यक्ष संदेश पारकर , उपनगराध्यक्ष सुशांत नाईक , माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , संदीप मेस्त्री , मिलींद मेस्त्री , नगरसेविका मेघा गांगण , मिथिलेश भंडारी, गौरव हर्णे , कुंदन हर्णे यांच्यासह कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात नगरसेविका सुप्रिया नलावडे , मनस्वी ठाणेकर ,आर्या राणे , नगरसेवक संकेत नाईक, बाळू मेस्त्री , सुजीत जाधव , अण्णा कोदे , वैभव मालंडकर ,मेघा सावंत , मिथुन ठाणेकर , सचिन आचरेकर,विशाल नेरकर, बाळा वराडकर , मधु हर्णे , प्रांजली आरोलकर , शितल मांजरेकर, बाळू पारकर, प्रसाद अंधारी यांच्यासह कणकवली शहरातील शेकडो महिलांसह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यामुळे वातावरण काहीकाळी तंग बनले होते.










