
कुडाळ : ‘तांडेल’ या आगामी चित्रपटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शूटिंग संपवून प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आपला मोर्चा निसर्ग संवर्धनाकडे वळवला आहे. काल शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आज त्यांनी कुडाळ परिसरातील किल्ले निवती येथील डुंगोबाचा डोंगर, कोचरा आणि पाटपाट आदी भागांना भेटी दिल्या. या दौऱ्याचा मुख्य हेतू 'बीज संकलन' (बिया गोळा करणे) हा होता. या भेटीदरम्यान त्यांनी पाट तलावाच्या सुशोभीकरणा संदर्भात चर्चा केली आणि कोकणाबद्दलचे आपले अथांग प्रेम व्यक्त केले. तसेच 'नाम फाउंडेशन'च्या कामाचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
बीज संकलन करण्याची संकल्पना आपल्याला स्वतःच्या आईकडून मिळाल्याचे सयाजी शिंदे यांनी अत्यंत भावूक होऊन सांगितले. ते म्हणाले, "माझ्या आईला बिया गोळा करण्याची जुनी सवय होती. मी मुंबईत असताना ती माझ्यासाठी नेहमी तिच्या बटव्यातून बिया घेऊन यायची. मी तिची 'बीज तुला' केली होती. ती बियाणी मी संपूर्ण महाराष्ट्रात लावेन. पुढे जाऊन त्यापासून तयार झालेल्या वृक्षांवर, फुला-फळांवर आणि त्यावर आश्रयाला येणाऱ्या पक्षांमध्ये मला माझी आई दिसेल, या भावनेतूनच ही बीज संकलनाची संकल्पना जन्माला आली."
सध्याच्या सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. "सध्या माणसाला पैशाचा प्रचंड मोठा रोग लागला आहे. पैशाच्या हव्यासापोटी माणूस काहीही करत सुटला आहे. पण कोणी सोन्याची बिस्किटे खाऊन जिवंत राहू शकतो का? आज माणसामाणसांतील संवाद संपला असून अहंकार मात्र प्रचंड बळावला आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, जिथे जिथे केवळ पैशाच्या हव्यासापोटी निसर्गाला घातक असणारे आणि निरुपयोगी प्रकल्प येत असतील, त्याला तिथल्या जनतेने नक्कीच विरोध केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोकणच्या सौंदर्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, "कोकण 'ऑल टाइम ब्युटीफुल' आहे. जगात काही सुंदर असेल तर ते फक्त कोकण आहे आणि ते तसंच राहावं हीच माझी इच्छा आहे. सध्या कोकणावर जे बाहेरून अंतर्गत आक्रमण होत आहे, त्यापासून कोकणला वाचवणे गरजेचे आहे. कोकणच्या झाडांच्या, पक्षांच्या आणि माशांच्या नावाने आम्ही उभे राहणार आणि कोणत्याही परिस्थितीत कोकण वाचवणार!"
वन विभाग आणि सरकारच्या कारभारावर सयाजी शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर्षी नर्सरींसाठी (रोपे वाटिका) शासनाने फंडच दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. "दोनशे प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती उपलब्ध असताना नर्सरीमध्ये केवळ २० ते ५० प्रकारच्याच प्रजाती का मिळतात? फॉरेस्ट खात्याने मागील ५०-६० वर्षांत याकडे का लक्ष दिले नाही, हा वादाचा विषय आहे. पण कोण वाईट करतंय हे पाहण्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो याकडे मी लक्ष देतोय. सरकार आपलेच आहे, त्यांनी भ्रष्टाचार केला, चोऱ्या केल्या की चांगले काम केले तरी ते आपलेच राहतात. शेवटी तिथे बसलेले लोक काही आकाशातून पडलेले नाहीत, त्यांनाही देवाने सद्बुद्धी द्यावी," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
सध्या बियांचा हंगाम सुरू असून सिंधुदुर्गातील युवकांनी याचा मोठ्या प्रमाणात फायदा उठवावा आणि जास्तीत जास्त बिया गोळा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. कोकणात मंदार गावडे व त्यांचे सहकारी हे बीज संकलनाचे काम उत्तम रीतीने करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान विश्वास चव्हाण (सीमा बायोटेक Pvt Ltd), विकास नलावडे (विकास हायटेक), संजय सावंत (वाइल्ड लाईफ वॉर्डन वनश्री), मेगल डिसोझा (Yout beats for climates), मंदार गावडे (वाइल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन), डॉ. धुमक (वाइल्ड लाईफ रेस्क्युअर), दर्शन वेंगुर्लेकर, राहुल जाधव, विनीत किनळेकर, अनुराग सिनारी, राजा, सचिन व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










