
सिंधुदुर्गनगरी : शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावत असताना डॉक्टर आणि फार्मासिस्टवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास १९ मेपासून OPD सेवा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी राजपत्रीत अधिकाऱ्याच्या मॅग्मो संघटनेसह, आरोग्य सेवा कर्मचारी महासंघ समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी आदींनी एकत्र येत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांना याबाबतचे निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली यावेळी सदर इसमास मेंटल हॉस्पीटलला दाखल केले आहे असे सांगितले तसेच वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल या आश्वासनानंतर OPD बंद आंदोलन स्थगीत केलं आहे. अशी माहिती वरील संघटनानी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १० मे २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे कर्तव्यावर असताना डॉ. ऋचा भांडवले आणि फार्मासिस्ट श्री. श्रेयस खंगर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप आरोपी मोकाट फिरत असल्याने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आरोपींना अटक होऊन योग्य ती कारवाई होईपर्यंत १९ मेपासून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून OPD सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. आपत्कालीन सेवा, प्रसूती सेवा, सर्पदंश उपचार आणि एमएलसी सेवा सुरू राहणार असून इतर सर्व नियमित सेवा बंद राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी तसेच सर्व आरोग्य संस्थांमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करत, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात डॉक्टर जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्यास ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी कर्मचारी पुढे येणार नाहीत, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
हे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिले आहे. यावेळी उमेश पाटील राज्य उपाध्यक्ष मॅग्मो संघटना, डॉ. रमेश कर्तसकर,डॉ. वर्षा शिरोडकर, आरोग्य संघटना सेवा समन्वय समती जिल्हा अध्यक्ष श्री.प्रकाश तेंडोलकर, समन्वय समितीचे लिलाधर सोमजी, मधुकर पाटील, विनिता मुंज, आर.डी.चेंदवणकर, संजिवनी काणेकर(सचिव) सोनाली काटकर इत्यादी उपस्थित होते.










