विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनाचंनिमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: May 29, 2025 16:56 PM
views 167  views

मुंबई : महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  दि.६ जून २०२५ रोजी महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठविणे, भित्तीपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांव्दारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षामध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. 

"आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार" हे ब्रिद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात  विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार दि. १ जून रोजी सर्व परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाच्या शहरात मॅरेथॉन ‘रन फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र यांचेसाठी विद्युत सुरक्षा प्रश्नमंजुषा जाहीर करण्यात आली आहे.  या प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महावितरण कार्यालय / रोहित्र पेटी / आर. एम. यु. /डिजिटल बोर्ड / शिडी गाडी / उपकेंद्र / तक्रार निवारण केंद्र / ग्राहक सुविधा केंद्र / रहिवासी परिसर इ. ठिकाणी  विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावण्यात येणार असून समाज माध्यमांद्वारे, रेडिओ, टि.व्ही. प्रिंट मिडिया तसेच इतर माध्यमे वापरुन विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. सोमवार दि. २ जून रोजी  राज्यातील ६५० उपविभाग अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येईल. ग्राहकांना विद्युत सुरक्षा विषयी ई-मेल पाठविणे. बाजार व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती, मंगळवार  दि. ३ व ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा, महावितरण कर्मचारी / अधिकारी यांच्यासाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

 दि.५ जून वसुंधरा दिनी १५० विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. दि.६ जून रोजी सकाळी १०:०० ते १०:१५ या वेळेत राज्यातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.