
सावंतवाडी : शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अत्यंत भरीव असे कार्य ज्यांनी केले, अत्यंत प्रतिकूल काळात संगीताचा प्रचार व प्रसार केला अश्या पद्मभूषण पं. श्रीकृष्ण नारायण तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्या ५० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आरवली - शिरोडा येथे एका संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या सुकन्या शोभना अरविंद आरोलकर आणि आरोलकर कुटुंबीय यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या समारोहाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक ज्येष्ठ कलाकार मंडळीनी उपस्थिती दर्शवली. रसिक श्रोत्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपस्थित रसिकांच्या साक्षीने सर्व मान्यवरांचे स्वागत करून दीप प्रज्वलनाने समारोहाचे उद्घाटन झाले. सौ शोभना रातंजनकर आरोलकर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर अत्रोली जयपुर घराण्याच्या ख्यातनाम गायिका श्रुती सडोलीकर-काटकर, चंद्रकांत काटकर ज्येष्ठ गायिका सुनीती गंगोळी, रघुनंदन गंगोळी, सौ अनघा गोगटे गोव्यातील सुप्रसिद्ध तबलावादक रोहिदास परब तसेच अरविंद आरोग्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शोभना आरोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपले वडील पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेले अतुलनीय कामगिरी त्यांची शिष्य परंपरा, नवनवीन रागांची निर्मिती, बंदीशींची रचना अनेक विविध पुस्तके त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार याविषयी उपस्थित श्रोते व स्थानिक कलाकार मंडळींना विस्तृत अशी माहिती दिली. स्थानिक उदयोन्मुख गायक भास्कर मेस्त्री यांनी इशस्तवन सादर केले. आरोलकर कुटुंबीयांच्या वतीने निमंत्रित मान्यवर कलाकारांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पणशीकर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या संगीत समारोहाचा प्रारंभ वेंगुर्ले येथील गायिका सौ. अनघा गोगटे यांच्या गायनाने झाला. यावेळी त्यांनी राग वाचस्पती मधील बंदिश सादर केली. त्यानंतर पंडित रातंजनकर यांनी निर्माण केलेल्या राग सालग वराळी यावर आधारित "घेई छंद मकरंद" हे नाट्यपद सादर केले. त्यांना तबला व संवादिनी साथ निरज भोसले आणि मंगेश मेस्त्री यांनी अतिशय प्रभावीपणे केली. समारोहातील द्वितीय निमंत्रित कलाकार सौ सुनीती गंगोळी यांनी भैरव थाटातील "गौरी" रागातील रचना सादर केल्या. त्यांना तबला साथ रोहिदास परब यांनी केली तर संवादिनीवर साथ निलेश मेस्त्री यांनी केली. सौ सुनीती या मुंबई येथील जेष्ठ कलाकार असून पंडित रातंजनकर यांच्या शिष्य परंपरेतील समर्थ अशा गायिका आहेत. या त्यानंतर पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या सुकन्या सौ. शोभना आरोलकर यांनी रात्री समय राग जोग सादर केला विलंबित आणि द्रुत लयीतील त्यांचा ख्याल अतिशय रंगतदार झाला त्यानंतर त्यांनी उपशास्त्रीय प्रकारातील होरी आणि पाळणा हे गायन प्रकार प्रस्तुत केले. सौ. शोभना आरोलकर यांना तबला व संवादिनीची साथ निरज भोसले आणि मंगेश मेस्त्री या युवा कलाकार जोड गोळीने अतिशय समर्पकपणे केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या समारंभाचे विशेष आकर्षण होते ते जयपूर अत्रोली घराण्याचा आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांचे शास्त्रीय गायन. त्यांनी रागानंद मधील पारंपारिक विलंबित बंदिश "दुंदू बारे सैय्या तोहे" प्रस्तुत करताना घराणेदार गायकीचे दर्शन घडविले आलापी बढत बोलताना लयकारी इत्यादींवरील आपले प्रभुत्व सहजच दाखवून दिले. राग नंद च्या दृतबंदीशीचे बोल होते "अज हून आये शाम" यानंतर त्यांनी रात्री समय राग कौशी कानडा प्रस्तुत करताना "लालन तुमबिन कौन करे" या मध्यलयीतील बांदिशित रंग भरले. अर्थात विलंबित येतील "कोलो मान रे ही बंदिशही रंगतदार ! यानंतर रसिकांच्या विनंतीचा मान राखत पाही सदा मी परी केवी नाथ भाषे मला हे बालगंधर्व यांच्या युगातील नाट्यपद सादर केले. आपल्या मैफिलीची आणि समारोहाची सांगता करताना त्यांनी पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांची शब्द आणि संगीता रचना असलेली भैरवी सादर केली श्रुती सडोलीकर काटकर यांना तबला साथ रोहिदास परब पणजी-गोवा यांची तर संवादिनी साथ जिल्हयातील सुप्रसिध्द संवादिनी वादक निलेश मेस्त्री, सावंतवाडी यांची लाभली तानपुऱ्यावर निधी जोशी आणि केतकी सावंत यांनी स्वरसाथ केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे यांनी केले आभार प्रदर्शन श्री शेखर पणशीकर यांनी तर हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी पणशीकर, दिलीप पणशीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. ध्वनी व्यवस्था किरण नाईक यांनी सांभाळले. सुमारे पाच तास चाललेल्या या सोबत सुंदर कार्यक्रमानंतर उपस्थित रसिकांना अरविंद आरोलकर आणि कुटुंबीयांतर्फे सुग्रास उपहार देण्यात आला. यापुढे हा संगीत समारोह प्रतिवर्षी संपन्न व्हावा अशी इच्छा व्यक्त करीत सर्व संगीत रसिक तसेच उपस्थित कलाकार मंडळींनी शोभना आरोलकर यांना प्रोत्साहन दिले.