बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या निमित्ताने विज्ञान दिंडीचे आयोजन..!

Edited by: संदीप देसाई
Published on: February 09, 2024 14:00 PM
views 91  views

सिंधुदुर्गनगरी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने 51 वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन 10 ते 14 फेब्रुवारी 2024  या कालावधीत जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त सावंतवाडी येथील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विज्ञान दिंडीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत, लेझीम प्रकार, पथनाट्य आदींचे ठिकठिकाणी सादरीकरण केले. विज्ञान पालखी व विविध वैज्ञानिकांच्या वेषभूषा या खास आकर्षण ठरल्या. दिंडीचा समारोप जीमखाना मैदानावर विज्ञान प्रदर्शनस्थळी करण्यात आला.

 कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक राधा अतकरी व इतर सदस्य, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजकुमार अवसरे, सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख व सिंधुदुर्ग विज्ञान मंडळ सदस्य, भोसले नॉलेज सिटीचे विद्यार्थी, गटसाधन केंद्राचे शिक्षक, शाळांचे विज्ञान शिक्षक व अनेक शिक्षकांच्या उपस्थितीत शिवउद्यानासमोर या दिंडीला प्रारंभ करण्यात आला. 

आरपीडी हायस्कूल, कळसूलकर हायस्कूल, मिलाग्रीस हायस्कूल, वि. स. खांडेकर हायस्कूल, सेंट्रल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांनी या विज्ञान दिंडीत आकर्षक चित्ररथासह सहभागी झाले होते. राज्याच्या सर्व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेले प्रकल्प घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व प्रयोगशाळा परिचर सावंतवाडीत दाखल झाले असून त्यांनी आपले प्रकल्प मांडणी चालू केली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध विषयांवरील व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम विज्ञान मेळावा आणि चालताबोलता प्रश्नमंजुषा असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.