
सिंधुदुर्ग : भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस आज मुंबईसह तळकोकणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सर्वत्र विविध समाजिक, धार्मिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांनी राज्यभर बॅनर लावले आहेत.
युवा नेते माजी खासदार निलेश यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उत्सवाचाच दिवस. राज्यभरातील कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याने आज सकाळी निलेश राणे मुंबई-अंधेरी येथील सिंधुदुर्ग भवनात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दुपारनंतर निलेश राणे हे सिंधुदुर्गात दाखल होतील. या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मालवण भाजपाच्या वतीने सकाळी ८ वाजता कांदळगाव रामेश्वर मंदीर येथे लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. ११ वाजता भाजपा कार्यालयात केक कापण्यात येणार आहे. त्यानंतर फातीमा कॉनव्हेट मेढा येथील मुलासोबत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर कुडाळ येथे विशाल फाउंडेशनच्या वतीने शिवगर्जना हे महानाट्य प्रयोग होणार आहे. सुमारे 50 हजार प्रेक्षक याचा लाभ घेणार आहेत. अनेक नेतेमंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत.